चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
जळगाव, 25 जुलै : जळगाव जिल्ह्यातील ज्या ज्या गावातील जवान शहीद झाले आहेत, त्या त्या गावात शहीद स्मारक उभारण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे. तसेच लवकरच त्याबाबत नियोजन केले जाणार असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. जळगाव जिल्हा नियोजन समितीची आज बैठक पार पडली. या बैठकीत हा ठराव मंजूर करण्यात आला आहे.
आमदार किशोर पाटील यांची मागणी अन् ठराव मंजूर –
जवान शहीद झाल्यानंतर त्या जवानाचे स्मारक व्हावे, अशी मागणी लोकप्रतिनिधींकडे केली जाते. दरम्यान, या पंचवार्षिकची ही शेवटची मिटिंग असून सुमारे 650 कोटींचा आपला बजेट आहे. या पार्श्वभूमीवर माझी येथे उपस्थित असलेल्या सर्वांसह अध्यक्षांना विनंती आहे की, शहीद जवानांच्या स्मारकासाठी निधीची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांनी केली.
दरम्यान, या मागणीवरून जळगाव जिल्ह्यातील ज्या ज्या गावातील जवान शहीद झाले आहेत, त्या त्या गावात शहीद स्मारक उभारण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आल्याची घोषणा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली.
बैठकीला यांची होती उपस्थिती –
जिल्हा नियोजन समितीच्या नुतन सभागृहात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीला ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, आ. चिमणराव पाटील, आ. शिरीष चौधरी, आ. चंद्रकांत पाटील, आ. किशोर पाटील, आ. मंगेश चव्हाण, आ. सुरेश भोळे, आ. लता सोनावणे, सर्व अशासकीय सदस्य, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकीत, प्रशिक्षणार्थी सहाय्यक जिल्हाधिकारी श्रीमती वेवोतोलु केजो, महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, जिल्हा नियोजन अधिकारी, विजय शिंदे, यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.
हेही वाचा : “….तर गोरगरीब जनता तुम्हाला डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही,” पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन