मुंबई, 24 मार्च : स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यानं राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात वादग्रस्त गाणे तयार करून राज्य सरकारवर टीका केलीय. यावरून कुणाल कामरा हा वादात सापडला असून त्याविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आता शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावर प्रतिक्रिया देत कुणाल काबराने दोन दिवसांत माफी न मागितल्यास त्याचं महाराष्ट्रात फिरणं मुश्किल करू, इशारा दिलाय.
मंत्री गुलाबराव पाटील काय म्हणाले? –
मंत्री गुलाबराव पाटील आज मुंबईत माध्यमांसोबत बोलताना म्हणाले की, कुणाला कामरा यांची जी वृत्ती ते नेहमी टीका करण्याची आहे. मागच्या काळात केंद्र सरकार तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्याचा त्यांनी काम केलंय. आता सध्या त्यांचं दुकान बंद झाल्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांवर त्यांनी टीका करण्याचा प्रयत्न केलाय. एका हातात संविधान दाखवायताएत आणि दुसरीकडे रिक्षावाला मुख्यमंत्री झाला यावरून टीका करताएत. खरंतर, त्या संविधानाच्या बळावरच एक रिक्षावाला राज्याचा मुख्यमंत्री झाला. यामुळे एकप्रकारे ते संविधानाचा अपमान ते करताएत. गरीब माणसाने मुख्यमंत्री होऊ नये, तर ही निषेधार्ह बाब आहे.
गुलाबराव पाटील यांचा इशारा –
दरम्यान, कुणाल कामरांना जर वाटत असेल की त्यांचं काहीच होणार नाही. तर काल शिवसैनिकांनी त्यांना चमत्कार दाखवलाय. आमचे आमदारा मुर्जित पेटल यांनी केलेल्या तक्रारीनुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. या दोन दिवसांत त्यांनी माफी मागितली नाही तर शिवसेनेच्या स्टाईलने त्यांच्या तोंडाला काळं फासतील आणि त्यांचं फिरणं मुश्किल करून टाकतील, असा इशारा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलाय. दरम्यान, मंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटातील संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केलीय.
नेमकं प्रकरण काय? –
कुणाल कामरा हा स्टँडअप कॉमेडियन असून विविध ठिकाणी त्याचे शो आयोजित केले जातात. अशातच ठाण्यातील एका हॉटेलात त्यांचा शो पार पडला असता, या शोमध्ये त्याने एकनाथ शिंदे यांना गद्दार म्हणत महाराष्ट्राच्या राजकारणावर भाष्य केलं. यामुळे कुणाल कामरा हा पुन्हा एकदा वादात आलाय. तर त्याविरोधात शिवसैनिकांनी आक्रमक होत त्याच्या स्टुडिओची तोडफोड केलीय. तर दुसरीकडे पोलिसांनी कुणाल कामरावर गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरु आहे. दरम्यान, कुणाल कामराच्या वक्तव्यावरून शिंदे सेनेचे आमदार-कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत.