नशिराबाद (जळगाव) : सध्या जो धर्माबरोबर राहील, तोच जिवंत राहील. जो धर्माच्या विरुद्ध राहील, त्याचं काही खरं नाही, असे वक्तव्य पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे. मंत्री गुलाबराव पाटील हे नशिराबाद येथे आयोजित किर्तन सप्ताहाच्या कार्यक्रमात बोलत होते.
नेमकं काय म्हणाले मंत्री गुलाबराव पाटील –
यावेळी कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, सध्या जो धर्माबरोबर राहील, तोच जिवंत राहील. जो धर्माच्या विरुद्ध राहील, त्याचं काही खरं नाही. त्यामुळे धर्मकार्य आणि भगवा झेंडा, याच्यावर कायम एकनिष्ठ राहणं आणि, एकजूट राहणं ही काळाची गरज आहे. आपण किती जातीपातीत वाटलो आहे, यापेक्षा आपण आधी हिंदू आहोत, मग इतर जातीचे आहोत.
हिंदू धर्म टिकला तर जात टिकेल –
पुढे बोलताना ते म्हणाले की, हिंदू धर्म टिकला तर जात टिकेल, हिंदू धर्म टिकणार नाही तर जात कुठून टिकेल, असा सवालही त्यांनी केला. त्यामुळे ही धर्मसेवा सुरू आहे, या धर्मसेवेला पुढच्या काळातही मदत करण्याचा प्रयत्न आम्ही करत राहू. हे आमचे कर्तव्यच आहे. कारण या भगव्या झेंड्यामुळेच मी मंत्री होऊ शकलो, हे सांगायला मला अभिमान वाटतो.
मंत्री जरी असलो तरी मी आधी हिंदू –
मी मंत्री जरी असलो तरी मी आधी हिंदू आहे, त्यामुळे मला माझ्या धर्माचा निश्चितपणे अभिमान आहे आणि गर्व आहे आणि तो प्रत्येकाला असणे काही गैर नाही, असेही मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी म्हटले.