धुळे : बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणी मोठ्या प्रमाणात टीका झाल्यानंतर माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. यानंतर महायुती सरकारमधील मंत्री जयकुमार रावल यांच्यावर माजी आमदार अनिल गोटे यांनी एक गंभीर आरोप केला आहे. महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री जयकुमार रावल यांनी तब्बल 2 कोटी 65 लाख रुपये हडप केले, असा गंभीर आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी मंत्री जयकुमार रावल यांच्यासंदर्भात गंभीर आरोप केले.
काय म्हणाले माजी आमदार अनिल गोटे –
पत्रकार परिषदेत बोलताना माजी आमदार अनिल गोटे म्हणाले की, मंत्री जयकुमार रावल यांनी स्वतःच्या लेटरहेडचा वापर केला. अधिकाऱ्यांवर दबाव आणला. तसेच जिल्हाधिकारी, जिल्हा भूमापन अधिकारी यांचा आदेश डावलून 2 कोटी 65 लाख रुपये शासनाच्या तिजोरीतून हडप केले आहे. तसेच आपल्यावर प्राणघातक हल्ला करण्याचे कट करताना रचले जात आहे, असा दावाही माजी आमदार अनिल गोटे यांनी केला.
जयकुमार रावल आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आपल्या मालकीची शेत जमीन ही शेवाळे धरणात जाणार असल्याचे भासवले. त्याचे तसे कागदपत्र तयार केले. त्यातून दबाव निर्माण करत तीन वेळा सदर जमिनीचा जॉइंट सर्वे करण्यास भाग पाडले. त्यासाठी तत्कालीन सरकारला आणि शासकीय कर्मचाऱ्यांना वेठीस धरले आणि आपले राजकीय वजन वापरत मंत्री जयकुमार रावल यांनी हे कृत्य केले, असेही अनिल गोटे म्हणाले.
या प्रकरणी माजी आमदार अनिल गोटे यांनी दोंडाईचा पोलीस ठाण्यामध्ये जयकुमार रावल आणि त्यांच्या परिवारा विरोधात तक्रार देखील केली आहे. तर अनिल गोटे यांनी केलेल्या या गंभीर आरोपांनंतर मंत्री जयकुमार रावल काय स्पष्टीकरण देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा – अखेर ठरलं!, एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला, शिवसेनेकडून खान्देशातील ‘या’ नेत्याला मिळाली मोठी संधी