पुणे, 25 डिसेंबर : मराठी साहित्य विश्वातील ज्येष्ठ साहित्यिक निरंजन घाटे सध्या गंभीर आजारपणाशी झुंज देत आहेत. त्यांच्या तब्येतीसंदर्भात त्यांनी व्यक्त केलेल्या व्यथा ऐकून मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांनी त्यांना दिलासा दिला आहे. ‘खचू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत,’ असे म्हणत सामंत यांनी घाटे यांना मानसिक आधार दिला.
राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक व विश्वकोश निर्मिती मंडळाचे सचिव डॉ. शामकांत देवरे हे घाटे सरांच्या प्रकृतीबाबत विचारपूस करायला गेले असता त्यांनी सामंत यांची घाटे सरांशी फोनवर बातचीत करून दिली. त्यावेळी महाराष्ट्र सरकार आपल्या सोबत असल्याची ग्वाही सामंत यांनी दिली.
एका बैठकीसाठी डॉ. शामकांत देवरे पुण्यात आले असता 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीनिमित्त सरहदचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार यांच्याकडून ज्येष्ठ साहित्यिक निरंजन घाटे यांच्या प्रकृतीबद्दल माहिती मिळाली. जगण्याचा कंटाळा आला असून इच्छामरणाची भावना घाटे यांनी व्यक्त केल्याचे नहार यांनी देवरे यांना सांगितले असता तत्परतेने संजय नहार आणि शामकांत देवरे यांनी घाटे यांची भेट घेत त्यांची व्यथा जाणून घेतली. त्यावेळी घाटे म्हणाले, ”आजारपणामुळे फक्त पडून राहावे लागते.
घरातल्या घरात हिंडु शकत नाही. रोजचा खर्चही दोन – अडीच हजार रुपये इतका आहे. मध्यंतरी पाच दिवस रुग्णालयात होतो, त्याचा 20 हजार दिवसाला इतका खर्च झाला. वर्षाला अंदाजे 60 हजार रॉयल्टी वगळता दुसरे उत्पन्नाचे साधन नाही. या सगळ्याला मी कंटाळलो आहे.” असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे, की तुम्ही दिल्लीतील वजन वापरून इच्छामरणाचा कायदा लवकर पास करा. असेही ते म्हणाले.
महाराष्ट्र सरकारच्या वतीने सर्वतोपरी मदत देण्याचे आश्वासन सामंत यांनी दिले असून अशाप्रकारे हतबल होण्याची वेळ कोणत्याही लेखकावर येऊ नये यासाठी विशेष धोरण राबविण्याची गरज असल्याचे सामंत सांगितले, अशी माहिती यावेळी देवरे यांनी दिली.
मराठीतले ज्येष्ठ विज्ञानलेखक म्हणून महाराष्ट्र घाटे सरांना ओळखतो. मराठी साहित्याची सेवा करणाऱ्या लेखकाला सर्वतोपरी आधार देणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो. याच भावनेतून आम्ही सरांच्या सोबत आहोत. तसेच कोणताही टोकाचा निर्णय न घेता हक्काने आम्हाला सेवा करण्याची संधी द्या, असे घाटे सरांना सामंत यांनी सांगितले असल्याची माहितीही देवरे यांनी यावेळी दिली.
हेही पाहा : मुक्त विद्यापीठात शिक्षण, शिपाई ते आता आर्मीत मोठा अधिकारी lieutenant ashok patil khandesh interview