ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 10 ऑक्टोबर : राज्यात तालुक्याच्या विकासाच्या बाबतीत एकमेव चर्चा केली जाते ती म्हणजे अमिरशभाई यांच्या शिरपूर पॅटर्नची. मात्र, मतदारसंघातील जनतेच्या शुभेच्छा आणि आशिर्वाद माझ्या पाठीशी असतील ना तर महाराष्ट्रात एकमेव पॅटर्न येणार ते म्हणजे ‘पाचोरा-भडगाव तालुका पॅटर्न’, अशी ग्वाही आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली. पाचोऱ्यात आयोजित केलेल्या व्यापारी संवाद मेळाव्यात ते आज बोलत होते.
आमदार किशोर आप्पा पाटील काय म्हणाले? –
आमदार किशोर आप्पा पाटील म्हणाले की, महायुती सरकारने नारी शक्तीचा सन्मान करत महिला सक्षमीकरणाचे काम केले. लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा करुन त्यांची दिवाळी गोड झाली आणि त्यांची दिवाळी गोड झाली म्हणून व्यापारी बांधवांची दिवाळी गोड झाली. तसेच सरकारने शेतकऱ्यांना 1 रुपयांत पीकविमा दिला. दरम्यान, 100 करोड रुपये पाचोरा तालुक्याला मिळाले. प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात पैसा आल्याने आनंदाने दिवाळी साजरी झाली. व्यापारपेठही यामुळे गजबजलेल्या होत्या. याचे एकमेव कारण म्हणजे राज्य सरकारने केलेले नियोजन, असेही आमदार पाटील म्हणाले. जोपर्यंत ग्राहक समृद्ध होत नाही तोपर्यंत व्यापारी समृद्ध होऊ शकत नाही, असेही ते म्हणाले.
पाचोरा तालुक्यातील हिवरा, तितुर, गळद, अग्नावती तसेच बहुळा यासारख्या नद्यांवर प्रति 1 किमी अंतरावर बंधारे बांधण्याचे काम केले आहे. यामुळे आधी असलेल्या पाण्याची समस्या दूर होऊन आज शेतमालाच्या उत्पन्नात दुप्पट वाढ झाली आहे आणि याचाही फायदा व्यापाारी बांधवांना झाला असल्याचे आमदार पाटील म्हणाले.
एमआयडीसीबाबत किशोर आप्पा काय म्हणाले? –
आमदार किशोर आप्पा पाटील म्हणाले की, पाचोरा भडगाव मतदारसंघासाठी पाणी आणि वीजेसाठी नियोजन करत शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले. पण महायुती सरकार तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मतदारसंघातील बेरोजगार तरुणांसाठी 250 हेक्टर जमिनीत एमआयडीसी मंजूर केली. दरम्यान, येणाऱ्या वर्षभरात देशातील दोन-चार चांगल्या पद्धतीचे उद्योग त्याठिकाणी आणू शकलो तर मतदारसंघातील तरुणांना नोकरीसाठी बाहेर जावे लागणार नाही, असे आश्वासन आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिले.
“ही निवडणूक जनतेने हातात घेतलीय” –
आमदार किशोर आप्पा पाटील पुढे बोलताना म्हणाले की, मतदारसंघात विकास काम केले असतानाही, माझ्या सभांमध्ये छुप्यापद्धतीने चित्रीकरण करुन खोट्यापद्धतीने व्हिडिओ व्हायरल करुन बदनाम करण्याचा डाव विरोधकांचा आहे. मात्र, मतदारसंघातील जनतेला वेड लागले नसून ही निवडणूक जनतेने हातात घेतली आहे. या मतदारसंघात केलेला विकास जनता त्यांच्या डोळ्याने पाहतेय. दरम्यान, विरोधकांना चष्मा लागलेला नसून मी केलेला विकास त्यांना दिसत नाही, असा टोला आमदार किशोर आप्पा पाटील यांनी लगावला.
हेही वाचा : Special Report : जनता कुणासोबत?, खान्देशातील तीन माजी खासदार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात