ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 6 मे : शेतीला उद्योग व व्यवसाय मानून त्यासाठी शेतकऱ्यांनी नुसती बांधावर जाऊन शेती न करता शेतात पुर्णवेळ शेती केली पाहिजे. तसेच शेतकरी जोपर्यंत शेतीला व्यावसायिक दर्जा देणार नाही, तोपर्यंत उत्पन्नात वाढ होणार नाही. म्हणून शेतकऱ्यांनी आता व्यावसायिकृष्ट्या शेती करणे गरजेचे असल्याचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी सांगितले. पाचोऱ्यात खरीप हंगामपुर्व आढावा व नियोजन सभेत ते आज 6 मे रोजी दुपारी बोलत होते. यावेळी शेतकऱ्यांसाठी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कार्यशाळेच्या माध्यमातून विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
तत्पुर्वी, खरीप हंगामपुर्व आढावा व नियोजन सभेत पाचोरा तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव यांनी कृषी विभागाबाबत करण्यात आलेल्या कामांची माहिती तसेच शेतकऱ्यांसाठीच्या योजनांबाबतचे सादरीकरण केले. याप्रसंगी आमदार किशोर आप्पा पाटील यांनी तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव तसेच त्यांच्यासोबतचे अधिकारी-कर्मचारी यांचे त्यांनी केलेल्या कामांबद्दल कौतुक करत अभिनंदन केले.
आमदार किशोर आप्पा पाटील काय म्हणाले? –
आमदार किशोर आप्पा पाटील पुढे म्हणाले की, जोपर्यंत युवक शेतीत सहभाग घेऊन शेतीशी संलग्न होणार नाही; तोपर्यंत खऱ्या अर्थांने शेतीच्या माध्यमातून ते आपल्या पुर्वजांना न्याय मिळवून देऊ शकत नाही. यामुळे येणाऱ्या काळात मतदारसंघात जास्तीत जास्त संख्येने युवकांचा शेतीत सहभाग वाढविण्यासाठी चळवळ उभी करण्यासाठी प्रयत्नशील आहे. तसेच पाचोरा-भडगाव तालुक्यात शेतकऱ्यांसमोर कापूस आणि मका अशी दोन प्रमुख पीके आहेत. मात्र, आता शेतकऱ्यांनी व्यावसायिकदृष्ट्या विचार करून पीक पद्धतीत बदल करत करडई, सोयाबीन, कडधान्यांची आंतरपिके घेतली पाहिजे.
गेल्या 11 वर्षांचा माझ्या आमदारकीच्या कार्यकाळात मला असं वाटतं की, शेतकऱ्यांना कसा न्याय मिळवून देता येईल, यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केला जातोय. आजच्या स्थितीत जळगाव जिल्ह्यात पाचोरा तालुका हा एकमेव असा तालुका आहे की, 100 करोड रूपयांचं अनुदान 2023-24 मध्ये मिळालं. यासोबतचं दुसऱ्या क्रमांकाचं अनुदान हे तत्कालीन आपत्ती आणि मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांना 47 कोटी रूपये मिळाले. मात्र, पाचोरा आणि भडगाव तालुका मिळून 139 कोटी रूपयांचे अनुदान मिळाले. दरम्यान, शेतकऱ्यांच्या प्रती असलेली नैतिकतेमुळे त्यासंदर्भातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यासाठी काम करता आल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.
“….तर चांगल्या पद्धतीची शेती करण्याचे काम होऊ शकते!”
गेल्या अनेक वर्षांपासून कृषी विभागाच्यावतीने वारंवार सांगण्यात येते की, 1 जून नंतरच कापसाची लागवड केली पाहिजे. असे असले तरी 15 मेच्या आधी कापसाची लागवड करण्याची स्पर्धा शेतकऱ्यांमध्ये असते. यावरून रब्बी हंगाम काढल्यानंतर शेतीला ऊन मिळालं पाहिजे जेणेकरून बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखला जाऊ शकतो, असे अनेक कृषी सहायक-अधिकारी शेतात जाऊन सांगतात. परंतु, शेतकऱ्यांच्या मे महिन्यात कापूस लागवडीच्या स्पर्धेमुळे शेती पिकांची उत्पादन क्षमता कमी झाली आणि बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढला, याला आपण सर्व शेतकरी जबाबदार असल्याचे आमदार पाटील म्हणाले. या क्षेत्रात पदवी प्रदान केलेल्या कृषी अधिकाऱ्यांचा सल्ला घेतला तर चांगल्या पद्धतीची शेती करण्याचे काम होऊ शकते, अशी अपेक्षा आमदार किशोर आप्पा पाटील यांनी व्यक्त केली.
कृषीसेवा केंद्राचे संचालकांसाठीचा ‘तो’ कठीण कायदा रद्द केला –
आमदार किशोर आप्पा पाटील पुढे म्हणाले की, बोगस बियाणे विरोधात कृषीसेवा केंद्राच्या संचालकांविरोधात असा गुन्हा दाखल करायचा कठीण कायदा मागील काळात राज्य सरकारने केला होता. मात्र, त्यावेळी अधिवेशनात याबाबत आवाज उठवला आणि तत्कालीन कृषी मंत्री तसेच मुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून विनंती केली की, कृषीसेवा केंद्राचा संचालक हा निर्माता नसून विक्रेता आहे. या निर्मात्याला परवानगी देण्याचं काम हे राज्य तसेच केंद्र सरकारचं आहे आणि परवानगी दिलेल्या त्या निर्मात्याकडून रितसरपणे डिलरर्शीप घेतलीय. असे असताना जर निर्माता एखादे बियाणे देत असेल तर तो विक्रेता हा शेतकऱ्यांना ते बियाणे देत असेल तर त्यामध्ये विक्रेत्याचा कुठलाही दोष नाही.
विक्रेत्याने तुम्ही निर्माता म्हणून ज्याला परवानगी दिलीय आणि जर त्याच्या व्यतिरिक्त बोगस बियाणे खरेदी करून शेतकऱ्यांना दिले तर त्या विक्रेत्याला फासावर लटकावा, त्या निर्णयामागे आम्ही आहोत. मात्र, सरकारडे नोंदणी केलेला निर्माता आणि त्याच्या परवानगी नुसार जर एखादा विक्रेता विक्री करत असेल तर त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ नये, यासाठी आवाज उठविण्याचं काम राज्य सरकारकडे केले आणि तो कठीण असलेला कायदा रद्द झाला, असे आमदार पाटील म्हणाले.
यांची होती उपस्थिती –
यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक कुरबान तडवी, पाचोरा प्रांताधिकारी भूषण अहिरे, नायब तहसिलदार विनोद कुमावत, पंचायत समिती गटविकास अधिकारी बोरसे, माजी जिल्हा परिषद सदस्य तथा भाजपा उपजिल्हा अध्यक्ष मधुकर काटे, तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनील पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राहुल पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रकाश तांबे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर बारावकर, विनोद महाजन, हेमंत चव्हाण, प्रविण ब्राम्हणे, सुनील पाटील, राजेश पाटील तसेच महसूल, पंचायत समिती तसेच कृषी विभागाचे कर्मचाऱ्यांसह शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.