ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 28 जुलै : पाचोरा दी पाचोरा पीपल्स को ऑपरेटिव्ह बँकेची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत सहकार पॅनलचा विजय झाला. दरम्यान, सहकार पॅनलच्या विजयी उमेदवारांचा आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते शिवतीर्थ शिवसेना कार्यालयावर सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार पाटील यांनी सर्व नवनियुक्त संचालकांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, उपनगराध्यक्ष शरद पाटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख सुनिल पाटील, शिवशक्ती भीमशक्तीचे जिल्हाप्रमुख प्रविण ब्राम्हणे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाचोरा पिपल्स बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनलचा विजय –
पाचोरा दी पाचोरा पीपल्स को ऑपरेटिव्ह बँकेची सार्वत्रिक निवडणुकीत सत्ताधारी अतुल संघवी यांच्या सहकार पॅनलला एकतर्फी विजय मिळाला. या निवडणुकीत एकमेव विरोधी उमेदवार डॉ. निलेश मराठे यांचा पराभव झाला. या बँकेच्या 15 संचालक पदासाठी सार्वत्रिक निवडणूक पार पडली. यात सहा जागा आरक्षित असल्याने त्या पूर्वीच बिनविरोध झाल्या.
यानंतर सर्वसाधारण 9 जागांसाठी 10 उमेदवार रिंगणात होते. 10 हजार 954 सभासद मतदारांपैकी 4 हजार 518 सभासदांनी मतदान केले. मतमोजणी व्यापारी भवन येथे दि. 14 जुलै रोजी पार पडली. यावेळी सहायक निबंधक निवडणूक अधिकारी आर. आर. पाटील यांनी संचालक म्हणून अधिकृत बिनविरोध झालेल्या जागांची घोषणा केली होती.
यात ओबीसी मतदारसंघात भागवत महालपुरे, पवन अग्रवाल, महिला राखीव – संगीत पाटे, संध्या पाटील, भटक्या विमुक्त मतदारसंघात विकास वाघ, अनु, जाती-जमातीसाठी अविनाश भालेराव यांचा समावेश होता. सर्वसाधारण 9 जागांसाठी 10 उमेदवार रिंगणात होते. यामध्ये विद्यमान चेअरमन अतुल संघवी, अॅड. स्वप्नील पाटील, प्रशांत अग्रवाल, देवेंद्र कोटेचा, डॉ अनंत पाटील, राहुल अशोक संघवी, नरेंद्र उत्तमराव पाटील, पुखराज इंदरचंद डांगी, अविनाश वसंतराव कुडे हे सहकार पॅनलचे उमेदवार एकतर्फी विजयी झाले. दरम्यान, विजयी उमेदवारांचा आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.