चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
पाचोरा, 6 एप्रिल: देशभरात जनगणना प्रक्रियेला सुरुवात झाली असून, त्याचबरोबर एसआयआर (मतदार यादी पुनर्निरीक्षण) प्रक्रिया देखील लवकरच सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने येत्या चार महिन्यांचा कालावधी कार्यकर्त्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मतदार याद्यांची पारदर्शकता राखण्यासाठी सर्वांनी सक्रियपणे कामाला लागावे, असे आवाहन करण्यात आले.
अनेक ठिकाणी बोगस मतदार आढळत असल्याने ही समस्या रोखणे मोठे आव्हान बनले आहे. त्यामुळे “मतदार यादी वाचाल तरच राजकारणात टिकाल, अन्यथा शंभर टक्के घरी बसाल,” अशी स्पष्ट भूमिका आमदार किशोर आप्पा पाटील यांनी मांडली. पाचोरा येथे आयोजित शिवसेना मेळाव्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
पाचोऱ्यात पार पडला शिवसेनेचा मेळावा –
पाचोरा येथील जुना सारोळा रोडवरील समर्थ लॉन्स येथे सोमवार, ६ एप्रिल रोजी दुपारी शिवसेनेचा भव्य मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्यात पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, मतदान यादी पुनर्निरीक्षण (SIR) तसेच जनगणना प्रक्रियेबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी आमदार किशोर आप्पा पाटील यांची अमरावती लोकसभा संपर्कप्रमुखपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कारही करण्यात आला.
पुढील चार महिने मतदार याद्यांवर लक्ष केंद्रित करा –
भारतीय जनता पक्षाचा देशभर झालेला विस्तार हा त्यांच्या नियोजनबद्ध आणि बुद्धीने केलेल्या कामाचा परिणाम आहे. याउलट, आपल्या कडे प्रचंड ताकद असूनही तिचा योग्य वापर होत नाही. त्यामुळे आता केवळ शारीरिक श्रमांवर नव्हे, तर बुद्धीचा वापर करून काम करण्याची गरज आहे, असे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पुढील चार महिने हे मतदार याद्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असून, कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकदीने आणि मेहनतीने काम केल्यास येणाऱ्या चाळीस वर्षांत कोणीही आपल्याला पराभूत करू शकणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
View this post on Instagram
बीएलए आणि सह बीएलए यांनी पूर्ण क्षमतेने काम करावे –
मतदार यादी पुनर्निरीक्षणाच्या पार्श्वभूमीवर बीएलओंच्या कार्यपद्धतीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी बीएलए आणि सह बीएलए यांची नियुक्ती तत्काळ करण्यात येणार असल्याचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी स्पष्ट केले. एसआयआर प्रक्रिया राबविताना ज्यांची बीएलए व सह बीएलए म्हणून नियुक्ती होईल, त्यांनी पूर्ण क्षमतेने आणि जबाबदारीने काम करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच, नियुक्त कार्यकर्त्यांना मतदार याद्यांवर प्रभावी काम करण्यासाठी येत्या काही दिवसांत अभ्यासकांकडून ऑनलाइन प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
यावेळी एसआयआर प्रक्रिया सुरू झाल्यानंतर बीएलओंच्या कार्यपद्धतीवर लक्ष ठेवून नेमके कसे काम करावे, याबाबतही आमदार पाटील यांनी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
‘१०० टक्के मतदान का होत नाही?’ –
मी अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहे; मात्र एकही अशी निवडणूक पाहिली नाही ज्यामध्ये १०० टक्के मतदान झाले आहे. अगदी छोट्या गावांमध्येही पूर्ण मतदान होत नाही. मग मतदानाचा टक्का ६५, ७० किंवा ७५ वरच का थांबतो? उर्वरित २५ टक्के मतदान नेमके कुठे जाते, असा सवाल आमदार किशोर आप्पा पाटील यांनी उपस्थित केला. याच पार्श्वभूमीवर एसआयआर प्रक्रिया राबविली जात असून, मतदार याद्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रियपणे काम करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सांगितले.
‘२०२९ पर्यंत भडगाव तालुका स्वतंत्र मतदारसंघ होईल’ –
आगामी काळात जनगणना पूर्ण झाल्यानंतर लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये मोठे बदल पाहायला मिळतील, असा अंदाज आमदार किशोर आप्पा पाटील यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रातील विधानसभा सदस्यांची संख्या सध्याच्या २८८ वरून वाढून सुमारे ४३० ते ४३५ पर्यंत जाण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.
ही संख्या वाढल्यास त्यापैकी सुमारे ३० ते ३५ जागा महिलांसाठी आरक्षित असतील, असेही त्यांनी नमूद केले. तसेच, जनगणना पूर्ण झाल्यानंतर २०२९ पर्यंत भडगाव तालुका स्वतंत्र मतदारसंघ म्हणून अस्तित्वात येईल, असे भाकितही त्यांनी केले.
आमदार किशोर आप्पा पाटील यांचा जाहीर सत्कार –
शिवसेनेकडून आमदार किशोर आप्पा पाटील यांची अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या संपर्कप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीनंतर त्यांनी अमरावती येथे जाऊन पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधत आढावा घेतला. दरम्यान, आज ६ एप्रिल रोजी आयोजित शिवसेनेच्या मेळाव्यात त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
मेळाव्यात राजेंद्र पाटील, भैय्यासाहेब पाटील, रावसाहेब पाटील, अस्मिता पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाना वाघ यांनी केले.
यावेळी पाचोरा व भडगावच्या नगराध्यक्षांसह शिवसेनेचे विविध आघाडीचे पुरुष व महिला पदाधिकारी, नगरसेवक-नगरसेविका, माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, पत्रकार आणि उपस्थित कार्यकर्त्यांनी आमदार पाटील यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. दरम्यान, लवकरच त्यांची मंत्रीपदी निवड व्हावी, अशा सदिच्छाही उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आल्या.
यांची होती उपस्थिती –
पाचोऱ्यात आयोजित या मेळाव्यात पाचोरा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुनिताताई पाटील, उपनगराध्यक्ष किशोर बारावकर, उपनगराध्यक्ष राजेंद्र पाटील, भडगावच्या नगराध्यक्षा रेखाताई मालचे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, कृषी उत्पन्न बाजारा समितीचे सभापती गणेश पाटील, शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख सुनिल पाटील, शिवशक्ती-भीमशक्तीचे जिल्हाप्रमुख प्रविण ब्राम्हणे, पाचोरा नगरपरिषदेचे गटनेते सुमित पाटील, जि.प. सदस्य पद्मसिंह पाटील, दीपकसिंह राजपूत, भूरा आप्पा, युवराज आबा, अरूण पाटील, राजेंद्र पाटील, लखीचंद पाटील, विकास तात्या, शालीग्राम मालकर, विनोद तावडे, महिला पदाधिकारी अस्मिता पाटील, ललिता पाटील यांच्यासह नगरसेवक आणि नगरसेविका, शिवसेनेचे विविध आघाडीचे पुरूष आणि महिला पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा: जेष्ठ नेते शरद पवार सलग तिसऱ्यांदा राज्यसभेत; महाराष्ट्रातील 7 खासदारांनी घेतली शपथ






