ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 10 जून : गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या वीजेबाबत तक्रारी प्राप्त होत आहेत. तरी देखील महावितरणकडून शेतकऱ्यांच्या वीजेबाबतच्या समस्या सोडविल्या जात नाहीयेत. ज्यादिवशी मी बाजूला होईन जाईल त्यादिवशी सबस्टेशनमध्ये बसणे अवघड होईल. डीपीडीसीच्या निधीतून एवढा निधी मंजूर करून देखील या समस्या सोडवल्या जात नसतील तर महावितरणचे अधिकारी-कर्मचारी नेमकं काय करताय? असा संतप्त सवाल करत पाचोरा-भडगावचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
दरम्यान, शेतकरी कशा परिस्थितीत शेती करतो याची जाणीव ठेवून येत्या एक महिन्याच्या आत विजेच्या समस्यांसह शेतातील ट्रान्सफॉर्मरचा प्रश्न सोडवावा, असे आदेशही आमदार पाटील यांनी दिले आहेत. पाचोरा प्रांताधिकारी कार्यालयात आज पार पडलेल्या वीज वितरण अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत ते बोलत होते.
यावेळी महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसह प्रांताधिकारी भूषण अहिरे, तहसीलदार विजय बनसोडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, माजी जि.प. सदस्य मधूकर काटे, उपजिल्हा प्रमुख किशोर बारावकर, भिमशक्ती शिवशक्तीचे जिल्हाप्रमुख प्रविण ब्राम्हणे, भूराआप्पा पाटील, शहरप्रमुख सुमित सावंत, भोला पाटील, आमदारांचे स्वीय सहायक राजेश पाटील, आदी उपस्थित होते.
आमदार किशोर आप्पा पाटील काय म्हणाले? –
या बैठकीनंतर आमदार किशोर आप्पा पाटील यांनी पत्रकारांसोबत बोलताना सांगितले की, पाचोरा-भडगाव मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या महावितरणसंदर्भात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. ट्रान्सफॉर्मर बसवण्यासाठी महावितरणकडून टाळाटाळ केली जात असल्याच्या तक्रारी देखील प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार, प्रांताधिकारी कार्यालयत तातडीची बैठक बोलवून महावितरणसंदर्भातील तक्रारींचा आढावा घेण्यात आला. शेतकऱ्यांकडून कापूस, मका, ज्वारी पिकांची लागवड करण्यात आली आहे. असे असताना वीजेच्या समस्येमुळे शेतकरी अडचणीत येतोय. म्हणून याबाबतचे प्रश्न बैठकीत उपस्थित करत आढावा घेण्यात आला.
आमदारांचा महावितरणच्या अधिकारी-कर्माचाऱ्यांना इशारा –
सदर बैठकीत महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून वीजेच्या समस्येबाबत माहिती घेऊन ते प्रश्न सोडवण्यासंदर्भात महत्वपूर्ण सूचना देण्यात आल्या आहेत. येत्या महिन्याभरात महावितरणकडून कार्यवाही करण्यात येईल. तसेच याबाबतचा अहवाल सादर केला जाईल, असा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला. दरम्यान, महावितरणकडून अहवाल वेळेत सादर झाला नाही तर संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यावर काय कारवाई करायची याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असे आमदार पाटील म्हणाले.
महावितरणच्या प्रश्नांसदर्भात प्रत्येक महिन्याला होणार आढावा बैठक –
महावितरणच्या प्रश्नांसंदर्भात लाईनमन पासून ते कार्यकारी अभियंता यांच्या उपस्थितीत प्रांताधिकारी कार्यालयात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आढावा बैठक आयोजित करण्यात येईल. तसेच जे अधिकारी-कर्मचारी या बैठकीत उपस्थित न राहिल्यास त्यांच्यावर वरिष्ठ स्तर माझ्यापद्धतीने तक्रार करेल, अशा इशाराही आमदार किशोर आप्पा पाटील यांनी यावेळी दिला आहे.
हेही वाचा : Breaking : कंत्राटी वायरमनने मागितली लाच अन् अडकला एसीबीच्या जाळ्यात, नेमकं प्रकरण काय?