ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 12 ऑक्टोबर : पुढच्या वर्षापासून शिवसेना पाचोरा आणि भडगाव तालुक्याचा दसरा मेळावा घेईल. यानंतर त्याठिकाणी रावणदहनाचा कार्यक्रम होईल. शिवसेनेच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल, अशी घोषणा आमदार किशोर पाटील यांनी आज केली. पाचोऱ्यातील शिवालय या त्यांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आमदार किशोर पाटील काय म्हणाले? –
आमदार किशोर पाटील पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, पाचोरा-भडगाव तालुक्याचा दीडशे ते दोनशे वर्षांपासून पाचोऱ्यात रावणदहनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत होते. सिंधी बांधवांकडून पाचोरा-भडगावातील राजकीय, शासकीय अधिकारी तसेच पत्रकारांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात येत होते. आणि याठिकाणी रावणदहनाचा उत्सव आनंदाने साजरा केला जात होता. मात्र, काही जणांनी व्यापाऱ्यांना दम दिला. यानंतर व्यापाऱ्यांनी संबंधितांसोबत संघर्ष करू शकत नाही. आणि म्हणून आम्ही घेतलेली परवानगी रद्द करत असून पंरपरेनुसार सुरू असलेला कार्यक्रम आजपासून रद्द करत आहोत, अशी भूमिका त्या व्यापाऱ्यांनी घेतली.
दरम्यान, पाचोऱ्यात दसऱ्यानिमित्त वर्षांनुवर्षांपासून चालू असलेली परंपरा खंडित होऊ नये म्हणून माझ्यासह शिवसेना पाचारो-भडगाव तालुक्याच्यावतीने आजपासून भविष्यात दरवर्षी सालाबादाप्रमाणे रावणदहणाचा कार्यक्रम करेल, अशी घोषणा आमदार किशोर पाटील यांनी यावेळी केली.
पाचोऱ्यात शिवसेनाचा होणार दसरा मेळावा –
बाळासाहेब ठाकरे हे जेव्हापासून शिवसेनेची स्थापना झाली तेव्हापासून त्यांनी भव्य असा दसरा मेळावा घेण्याची परंपरा सुरू केली. तसेच मेळाव्यानंतर रावणदहन करण्याचा कार्यक्रम त्याच मैदानावर ते घ्यायचे. त्याचपद्धतीने पुढच्या वर्षापासून शिवसेना पाचोरा आणि भडगाव तालुक्याचा दसरा मेळावा घेईल. यानंतर त्याठिकाणी रावणदहनाचा कार्यक्रम होईल. अशापद्धतीची शिवसेनेच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल, अशी माहिती आमदार किशोर पाटील यांनी यावेळी दिली.