चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
चाळीसगाव, 3 एप्रिल : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून तिकिट कापण्यात आलेले विद्यमान खासदार उन्मेष पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी उन्मेष पाटील यांच्या पक्षप्रवेशावर मोठा दावा केला आहे.
काय म्हणाले मंगेश चव्हाण? –
उन्मेष पाटील यांच्या पक्षप्रवेशावर बोलताना आमदार मंगेश चव्हाण म्हणाले की, भारतीय जनता पक्षातून कुणीही गेले तरी फटका बसत नाही. एकनाथराव खडसेंपासूनचा हा इतिहास आहे. आमच्या पक्षात पार्टीमुळे नेता आहे, नेत्यामुळे पार्टी नाही. आमचा पक्ष हा कार्यकर्त्यांवर आधारित आहे. म्हणून कुणी आले आणि गेले याचाही काही परिणाम पक्षावर होत नाही. पण मला विश्वास आहे, उन्मेष पाटील तसा निर्णय घेणार नाहीत.
आमदार मंगेश चव्हाण यांचा दावा –
आमदार मंगेश चव्हाण पुढे म्हणाले की, उन्मेष पाटील हे माझे चांगले मित्र असून त्यांचा स्वभाव खूप चंचल आहे 2014 ला देखील ते शिवसेनेच्या संपर्कात होते, याचा मी साक्षीदार आहे. आता पुन्हा त्या रस्त्यावर जायला नको, कदाचित ते जर जात असतील तर त्यांचे राजकीय नुकसाने होऊ शकते, असा माझा प्राथमिक अंदाज असल्याचे ते म्हणाले.
उन्मेष पाटील आज ठाकरे गटात जाणार –
गेल्या काही दिवसांपासून खासदार उन्मेष पाटील हे ठाकरे गटाच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, काल त्यांनी मुंबईत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांची त्यांच्या भांडूप येथील निवासस्थानी भेट घेतली. यानंतर थोड्याच वेळाने त्यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेत पक्षप्रवेशाबद्दल चर्चा केली असून ते आज ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
हेही वाचा : भाजप खासदार उन्मेष पाटील ठाकरेंच्या शिवसेनेत जाणार का? संजय राऊतांनीच दिली महत्वाची माहिती