मुंबई, 23 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावतीच्या काँग्रेस आमदाराने अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष यांच्या उपस्थितीत त्यांनी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला. अमरावती विधानसभा मतदार संघातून ही त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.
सुलभा खोडके या काँग्रेस पक्ष सोडणाऱ्या तिसऱ्या आमदार आहेत. देगलूरचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी नुकताच भाजपमध्ये तर इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. सुलभा खोडके यांच्यासह माजी महापौर जफर शेख जब्बार, पदाधिकारी अॅड. शोएब खान, बडनेराचे नगरसेवक अयूब भाई, सचिव आसिफ भाई व इतर स्थानिक नेत्यांनी पक्षात प्रवेश केला.
माजी आमदार कल्याणराव पाटील यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश –
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर येवल्याचे माजी आमदार कल्याणराव पाटील यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने शिवसेना-ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी चे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रवादी चे कार्याध्यक्ष तथा आमदार पंकज भुजबळ यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. कल्याणराव पाटील यांच्या प्रवेशामुळे या भागात पक्षाचा पाया आणखी मजबूत होणार आहे. येवला हा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा मतदारसंघ आहे.
हेही वाचा : अजितदादा बारामतीमधूनच लढणार, राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर, कुणाकुणाला मिळाली संधी?