मुंबई – महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली. महायुतीच्या सरकारच्या ऐतिहासिक शपथविधी सोहळ्याचे आयोजन आज मुंबईतील आझाद मैदानावर पार पडले. या ऐतिहासिक शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच हजारो लोकांच्या साक्षीने हा ऐतिहासिक सोहळा पार पडला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनाही या शपथविधी सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आले होते. मात्र, वैयक्तिक कारणामुळे ते या शपथविधी सोहळ्याला हजर राहू शकले नाहीत. पण फडणवीस सरकारच्या सोहळ्यानंतर राज ठाकरेंनी खास ट्विट करत नवीन सरकारला शुभेच्छा दिल्या.
काय म्हणाले राज ठाकरे –
आपल्या पोस्टमध्ये राज ठाकरे यांनी लिहिलं की,
‘आज माझे स्नेही आणि भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील नेते श्री. देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, याबद्दल त्यांचं अभिनंदन.
2019 ला खरंतर ही संधी त्यांना मिळायला हवी होती, पण तेंव्हा आणि पुढे 2022 मध्ये जे घडलं त्यामुळे ती संधी हुकली. असो, पण यावेळेस महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला म्हणण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला जे प्रचंड अविश्वसनीय बहुमत दिलं आहे, त्याचा या राज्यासाठी, इथल्या मराठी माणसांसाठी आणि मराठी भाषा आणि संस्कृतीसाठी तुम्ही योग्य वापर कराल अशी मी आशा करतो.
पुढची 5 वर्ष सरकारच्या कुठल्याही चांगल्या उपक्रमांना माझा, माझ्या पक्षाचा पाठींबा असेल.
पण सरकार चुकतंय, लोकांना गृहीत धरतंय असं जर जाणवलं, तर मात्र विधिमंडळात जरी सध्या शक्य नसलं तरी, विधिमंडळाच्या बाहेर मात्र आम्ही सरकारला त्यांच्या चुकांची जाणीव करून देऊ हे नक्की…
मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, आणि उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे आणि श्री अजित पवार आणि तसंच भविष्यातील त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शुभेच्छा!’
राज ठाकरे.
शपथविधी सोहळ्याला कोण कोण होतं उपस्थित –
दरम्यान, आजच्या या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी, निर्मला सीतारामन, शिवराज सिंह चौहान, रामदास आठवले, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा सरमा, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, उद्योगपती मुकेश अंबानी, निता अंबानी, सचिन तेंडुलकर, अंजली तेंडुलकर, अभिनेता शाहरूख खान, सलमान खान, संजय दत्त, माधुरी दिक्षीत, रणबीर सिंग, विकी कौशल आदी मान्यवर उपस्थित होते.