ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 6 ऑक्टोबर : पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी परिसरात असलेल्या घाटमाथ्यांवर मागील महिन्यात अतिवृष्टी झाली. यामुळे सातगाव डोंगरी परिसरात असलेल्या गावांमध्ये पुरस्थिती निर्माण झाली होती. यासोबतच नदीलगतच्या शेकडो घरांमध्ये पाणी शिरल्याने संसारपयोगी वस्तू, अन्न धान्य तसेच शेतीपिकांचे नुकसान झाले. यासोबतच जनावरांची देखील जीवित हानी झाली होती. या पार्श्वभूमीवर धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार शोभा बच्छाव यांनी सातगाव डोंगरीत झालेल्या नुकसानीची काल 5 ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाहणी केली.
काँग्रेसकडून जळगाव जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागात पाहणी –
नुकसानीची पाहणी केल्यानंतर शोभा बच्छाव पत्रकारांसोबत बोलताना म्हणाल्या की, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्यावतीने उत्तर महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा पाहणी दौरा करण्यात येतोय. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील एरंडोल, भडगाव आणि पाचोरा तालुक्यात काँग्रेस पदाधिकाऱ्यांना तसेच अधिकाऱ्यांना सोबत घेऊन नुकसानीची पाहणी करण्यात आली.
शोभा बच्छाव यांनी केली नुकसान भरपाई मिळण्याची मागणी –
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतीपिके तसेच संसारपयोगी साहित्य, जनावरे आदींचा या नुकसानीत समावेश आहे. दरम्यान, तहसीलदार तसेच तलाठींच्या माध्यमातून सरसकट पंचनामे करून लवकरात लवकर त्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, अशी मागणी शोभा बच्छाव यांनी केली.
‘त्या’ कुटुंबियांना जाहीर केलेली 1 लाख रूपयांची मदत देण्यात यावी –
खासदार शोभा बच्छाव यांनी सातगाव डोंगरीतील पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबियांसोबत संवाद साधला. यावेळी संबंधित नागरिकांनी पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबियांना जाहीर झालेली 1 लाख रूपयांची मदत मिळाली नसल्याचे शोभा बच्छाव यांना सांगितले. याबाबत बोलताना खासदार बच्छाव म्हणाल्या की, सातगाव डोंगरीतील 175 ते 200 घरांमध्ये पाणी शिरल्याने प्रचंड नुकसान झाले असून येथील आमदारांनी याठिकाणी पाहणी केली. यानंतर आपत्ती व्यवस्थापन मंत्र्यांनी 1 लाख रूपये प्रति कुटुंब देण्याची घोषणा केली होती.
मात्र, अद्यापही ती मदत संबंधितांना मिळालेली नाहीये. दरम्यान, ज्यापद्धतीने नुकसान झालेल्या कुटुंबियांना मदत देण्याचे जाहीर करण्यात आले होते त्यानुसार मदत दिली पाहिजे. यासोबतच संपुर्ण महाराष्ट्रात ज्या-ज्या ठिकाणी शेतीपिके, घरे तसेच जनावरे आदी बाबींचे नुकसान झाले आहे त्याची भरपाई मिळाली पाहिजे, अशी मागणी खासदार शोभा बच्छाव यांनी केली.