मुंबई, 25 जानेवारी : मराठा आरक्षणच्या मागणीसाठी मराठा समाजाचा पायी मोर्चा हा लोणावळ्यापर्यंत पोहचला असताना मोर्चासाठी मुंबईतील आझाद मैदानची पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. दरम्यान, मनोज जरांगे हे आंदोलनावर ठाम असून त्यांनी लवकरच मुंबईत दाखल होण्याचा निर्धार केला आहे.
काय आहे संपूर्ण बातमी? –
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी निघालेला पायी मोर्चा हा लोणावळ्यात पोहचला आहे. या मोर्चात दिवसेंदिवस लाखो मराठा बांधव सहभागी होत आहे. आझाद मैदान पोलिसांनी आज मनोज जरांगे पाटील यांना नोटीस बजावत आझाद मैदानची परवानगी नाकारली आहे. मुंबईतील जनजीवन विस्कळीत होऊ नये, म्हणून त्यांनी खारघर येथील मैदानावर आंदोलन करावे, अशी विनंती पोलिसांनी जरांगे यांना केली आहे.
मनोज जरांगे ठाम –
आझाद मैदान पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन तडाखे यांनी मनोज जरांगे यांना पत्र लिहून आझाद मैदान उपलब्ध नसल्याचे सांगितले आहे. दरम्यान, पोलिसांकडून नोटीस मिळाल्यानंतर मनोज जरांगे यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. आम्ही आता आरक्षण घेतल्याशिवाय माघारी हटणार नाही, आम्ही आझाद मैदानात जाऊन बसणार आहोत, असा ठाम पवित्रा मनोज जरांगे पाटील यांनी घेतला आहे.
मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी तोडगा काढावा –
मला विनंती करायची आहे, आम्हाला तोडगा काढायचा आहे, आम्ही मजा करायला मुंबईला आलेलो नाही. मुंबईकरांचे आणि आमचेही हाल होऊ नयेत. त्यामुळे तोडगा काढा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी तिघांनी चर्चा करावी आणि लगेच यावर तोडगा काढावा, असे जरांगे यांनी स्पष्ठ केले.हेही वाचा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रमले शेतात; म्हणाले, मातीचा गंध आणि सुगंध शेतीकडे खेचून आणतो!