ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 21 मे : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पावसाळ्यापूर्वी पाचोरा शहरातील गटारी, नाले व भुयारी गटारांमधील गाळ काढण्याचे व चेंबर स्वच्छ करण्याचे काम पाचोरा नगरपालिकेच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. यंदा अवकाळी पावसाचा अंदाज लक्षात घेता, पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी पाचोरा नगरपरिषदेला तातडीने स्वच्छता मोहिम सुरु करण्याचे आदेश दिले.
काय आहे संपुर्ण बातमी? –
आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिलेल्या या आदेशानुसार नगरपालिकेचे मुख्य प्रशासक तथा मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी त्वरित कृती करत आरोग्य निरीक्षक तुषार नक्वाल यांना मोहिमेची जबाबदारी सोपवली. मोहिमेची सुरुवात प्रभाग क्रमांक आठ येथून करण्यात आली. यावेळी प्रभागातील जनसेवक बंडू केशव सोनार यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वच्छता मोहिमेला औपचारिक प्रारंभ करण्यात आला.
शहरभर स्वच्छता मोहिम –
गटारी आणि भुयारी गटारांमध्ये वर्षभर साचलेल्या गाळामुळे पावसाळ्यात पाणी साचण्याची व रस्त्यांवर पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर नगरपालिकेने टप्प्याटप्प्याने संपूर्ण शहरभर स्वच्छता करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वच्छता मोहिमेचे काम नगरपालिका कर्मचाऱ्यांद्वारे युद्धपातळीवर सुरू असून, प्रभागनिहाय नियोजन करण्यात आले आहे.
नागरिकांनीही सहकार्य करण्याचे नगरपरिषदेचे आवाहन –
स्वच्छता कामावेळी आरोग्य विभागाचे मुकादम पांडुरंग कोळी आणि भिकन गायकवाड यांनी देखरेख केली. पाचोरा शहरातील सर्व प्रभागांमध्ये ही मोहिम नियोजनबद्ध रितीने राबवली जाणार असून, नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन नगरपरिषदेकडून करण्यात आले आहे. शहरातील स्वच्छता, आरोग्य व नागरी सुविधा सक्षम ठेवण्यासाठी हे अभियान महत्त्वाचे असून, येत्या पावसाळ्यात नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे.
हेही वाचा : पाचोऱ्यासह जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी; पुढील दोन दिवस पावसाचे; हवामानाचा नेमका अंदाज काय?