चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
नागपूर, 8 डिसेंबर : महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून नागपूर येथे सुरू झाले आहे. या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनासाठी तालिका अध्यक्षांची नावे जाहीर केली. यामध्ये पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांची तालिका अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत बोलतांना विधानसभेतील तालिका अध्यक्षांची नावे जाहीर केली. यामध्ये पाचोरा भडगाव तालुक्याचे आमदार किशोर आप्पा पाटील यांची तालिका अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. यावेळी विधानसभेत बोलताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, महाराष्ट्र विधानसभा नियम 8 च्या पोटनियम 1 अन्वये विधानसभेचे सदस्य चैनसुख संचेती, किशोर आप्पा पाटील, सरोज अहिरे, डॉ. राहुल पाटील, उत्तमराव जानकर, रामदास मसराम, समीर कुणावार यांची तालिका अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे.
सलग दुसऱ्यांदा मिळाली मोठी संधी –
दरम्यान, याचवर्षी 30 जूनपासून ते येत्या 18 जुलैपर्यंत झालेल्या पावसाळी अधिवेशनात पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांची तालिका अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. यानंतर पावसाळी अधिवेशनानंतर सलग दुसऱ्यांदा आता नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आमदार किशोर आप्पा पाटील यांची तालिका अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
काय आहे तालिका अध्यक्षांचे महत्त्व?
विधानसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या अनुपस्थितीत कामकाज पाहण्यासाठी तालिका अध्यक्षांची निवड केली जाते. विधानसभेचे सदस्य असलेले काही अनुभवी सदस्य तालिका अध्यक्ष म्हणून निवडले जातात. विधानसभा अध्यक्षांच्या गैरहजेरीत तालिका अध्यक्ष हे सभागृहाचे कामकाज चालवतात आणि सभागृहातील नियमांनुसार कामकाज सुरळीत ठेवण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते.






