चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
नागपूर, 8 डिसेंबर : महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून नागपूर येथे सुरू झाले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आज विधानसभा सभागृहाने माजी मंत्री, माजी आमदार यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव एकमताने मंजूर केला.
यावेळी विधानसभेत दिवंगत शिवाजीराव कर्डिले, महादेवराव शिवणकर, भारत बोंद्रे, श्याम उर्फ जनार्दन अष्टेकर, यशवंत दळवी, नारायण पटेल, सिद्रामप्पा मलकप्पा पाटील, गिल्बर्ट मेंडोंसा, राजीव देशमुख आणि श्रीमती निर्मला ठोकळ या लोकप्रतिनिधी व समाजसेवकांनी शिक्षण, सहकार, शेती, क्रीडा, जलसंधारण, उद्योग, आरोग्य, महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले.
या दिवंगत सदस्यांनी विधानसभा/लोकसभा, पालिका, जिल्हा परिषद, सहकारी संस्था, शिक्षणसंस्था यामधून दीर्घकाळ जनसेवा केली. त्यांच्या निधनामुळे राज्याची अपरिमित हानी झाल्याचे विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी यावेळी नमूद केले. शोक प्रस्ताव मंजूर करताना सदस्यांनी त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभे राहून श्रद्धांजली अर्पण केली.
वंदे मातरम् व राज्यगीताने हिवाळी अधिवेशनातील विधानसभा कामकाजाची सुरुवात –
तत्पूर्वी, विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या विधानसभेच्या कामकाजास ‘वंदे मातरम्’ व ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताने सुरूवात झाली. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्रीगण यांच्यासह सभागृहाचे सदस्य उपस्थित होते. यावेळी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय लिखित ‘वंदे मातरम’ या गीतास १५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सभागृहात ‘वंदे मातरम’ गीताचे संपूर्ण गायन करण्यात आले.






