चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
ठाणे, 1 मे : मुंबईतील लोकसभा मतदारसंघांबाबत महायुतीत जागावाटपावरून तिढा निर्माण झाला होता. मात्र, हा तिढा आता टप्प्याटप्प्याने सुटताना दिसून येत आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेच्या (शिंदे गट) वाटेला आला असून उमेदवाराची घोषणा करण्यात आली. तर दुसरीकडे कल्याण लोकसभा मतदारसंघातून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. अखेर, ठाण्याचा बालेकिल्ला आपल्याकडे ठेवण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यश मिळाले आहे.
नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर –
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे मानले जाणारे, शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांना ठाणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हस्के यांच्या नावाची अधिकृतपणे घोषणा केली असून आता ते खासदारकीच्या निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. नगरसेवक ते खासदारकीची उमेदवारी असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या सोबत राहिले –
शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी त्यांची हकालपट्टी केली होती. उद्धव ठाकरे यांनी केलेली त्याकाळातील ती पहिली हकालपट्टीची कारवाई होती. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत कायम राहात त्यांनी शिवसेनेचे प्रवक्तेपद सांभाळले. यामुळे ठाणे लोकसभा मतदारसंघातून त्यांनाच उमेदवारी मिळणार हे निश्चित मानले जात होते.
कोण विरोधात लढणार? –
शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के हे महायुतीचे उमेदवार असून त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीच्या उमेदवार ठाकरे गटाचे राजन विचारे निवडणुकीच्या मैदानात आहेत. दरम्यान, त्यांनी काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ठाणे हा शिवसेनाचा बालेकिल्ला राहिलेला आहे. मात्र, या लोकसभा निवडणुकीआधी शिवसेनेत दोन गट असल्याने ही निवडणुक चुरशीची मानली जात आहे.
मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र कल्याणमधून लढणार –
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नावाची देखील घोषणा करण्यात आली. ते पुन्हा एकदा कल्याण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. श्रीकांत शिंदे हे गेल्या दहा वर्षांपासून कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार असून आता ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांच्याविरोधात त्यांचा निवडणुकीचा सामना रंगणार आहे. वैशाली दरेकर यांनी कालच निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.