मुंबई, 8 फेब्रुवारी : जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव काल एक धक्कादायक घटना घडली. चाळीसगाव शहरात भाजपच्या माजी नगरसेवकावर अज्ञातांनी गोळीबार केला. या घटनेनंतर पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्था बाबत चर्चा होऊ लागली आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने काय म्हटले –
गृहमंत्री राजीनामा द्या, गोळीबार हा कुणीही केला आणि कुणावरही केला तरी तो निषेधार्थच आहे. पण गोळीबार आणि जीवघेणे हल्ले हे राजकीय सूडातूनच होत आहेत. जनतेच्या मनात भीती निर्माण करून सत्ता राखणं अशक्य आहे, कारण अशा प्रकारच्या दडपशाहीला जनता निवडणूकीत उत्तर देईलच. परंतु, वाढत्या राजकीय गुन्हेगारीवर गृहमंत्र्यांची काय भूमिका? येत्या काळात महाराष्ट्र विकास आणि प्रगतीच्या वाटेवर नाही तर गुन्हेगारीच्याच वाटेवर जाताना दिसतोय, असे ट्विट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.
काल चाळीसगावात नेमकं काय घडलं –
चाळीसगाव शहरात भाजपच्या माजी नगरसेवकावर अज्ञातांनी गोळीबार केल्याची घटना काल घडली. चाळीसगाव शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात काल संध्याकाळी 5 ते 6 वाजेच्या सुमारास अज्ञातांनी भाजप नगरसेवक यांच्यावर गोळीबार केला. महेंद्र उर्फ बाळू मोरे असे भाजपच्या या माजी नगरसेवकाचे नाव आहे.
अज्ञातांनी केलेल्या या गोळीबाराच्या घटनेत महेंद्र मोरे यांना तीन गोळ्या लागल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. मोरे यांना चाळीसगावच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. परस्पर वादातून ही घटना घडली अशी प्राथमिक माहिती आहे.
हेही वाचा : Chalisgaon Crime : भाजपच्या माजी नगरसेवकावर गोळीबार, चाळीसगावमधील धक्कादायक घटना