चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
जळगाव, 6 एप्रिल : राज्याचे लक्ष लागून असलेल्या जळगाव लोकसभा मतदारसंघात गेल्या दोन दिवसांपूर्वीच राजकीय भूकंप घडल्यानंतर पुन्हा एकदा मोठी बातमी समोर आली आहे. शरद पवार गटाचे विधान परिषद आमदार तथा माजी मंत्री एकनाथ खडसे हे पुन्हा भाजपात जाणार आहेत.
काय आहे संपूर्ण बातमी? –
गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे हे भाजपात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच ते दिल्ली दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांच्या पक्षप्रवेशाबाबत चर्चा सुरू झाल्या होत्या. दरम्यान, आज त्यांनी स्वतःच याबाबतची माहिती देत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले आहे.
भाजपमध्ये प्रवेश कधी करणार? –
मागच्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे भाजपमध्ये परत येतील अशा चर्चा सुरू होत्या. एकनाथ खडसे यांनी दिल्ली दौऱ्यावरून परत आल्यानंतर त्यांनी सूचक विधान केले होते. पक्षप्रवेशाबाबतचा निर्णय हा असा काही एक दिवसात होत नसतो, कार्यकर्त्यांना सहकाऱ्यांना विश्वासात घेऊनच निर्णय होत असतात. अशी कोणतीही प्रक्रिया मी आतापर्यंत केलेली नाही. त्यामुळे आता या सर्व प्रश्नांना मला पूर्णविराम द्यावासा वाटतो. जेव्हा अशा संदर्भातला विषय येईल तेव्हा मी स्वतः त्याबद्दलची माहिती तुम्हा सर्वांना देईन’, असे खडसे म्हणाले होते. दरम्यान, त्यांनी भाजपमध्ये जाण्याचे निश्चित केले असून ते लवकरच भाजपात प्रवेश करणार आहेत. मात्र, त्यांचा पक्षप्रवेश कधी होणार याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
रक्षा खडसेंची उमेदवारी वाचवण्यासाठी डाव –
भाजपने रावेर लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर अंतर्गत नाराजीनाट्य दिसून आले. यानंतर रक्षा खडसे यांच्यासमोर पक्षातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांचेच आव्हान समोर उभे राहिले होते. यावरून रक्षा खडसे यांची उमेदवारी जाणार असल्याच्या चर्चा मोठ्या प्रमाणात रंगल्या होत्या. दरम्यान, एकनाथ खडसे यांनी दिल्ली दौरा करत रक्षा खडसे यांची उमेदवारी वाचवत स्वतः देखील भाजपमध्ये प्रवेश करण्याचे निश्चित केल्याचे सांगितले जात आहे.
राष्ट्रवादीत 2020 साली केला होता प्रवेश –
एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिट्ठी देत 23 ऑक्टोबर 2020 रोजी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. शरद पवारांनी मला जर राष्ट्रवादीत घेतले नसते तर माझे राजकीय करिअर संपले असते, असे एकनाथ खडसे यांनी त्यावेळी म्हटले होते. यानंतर त्यांना विधानपरिषद आमदारपदाची संधी मिळाली. तसेच त्यांच्या कन्या रोहिनी खडसे ह्या शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा आहेत.