मुंबई, 30 जानेवारी : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले राष्ट्रवादी-काँग्रेसचे (शरद पवार गट) संजय गरूड यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गरूड यांचा हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी गरूड यांच्या शेकडो समर्थक कार्यकर्त्यांनी देखील भाजपात प्रवेश केला.
संजय गरूड भाजपात –
एकेकाळी संजय गरूड हे मंत्री गिरीश महाजन यांचे कट्टर प्रतिस्पर्धी मानले जात होते. दरम्यान, गेल्या आठवड्यात माजी खासदार डॉ. उल्हास पाटील व त्यांची कन्या डॉ. केतकी पाटील यांनी भाजपात प्रवेश केला होता. यानंतर संजय गरूड यांचा भाजपात प्रवेश होणार, अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र, आज मुंबईत संजय गरूड यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्री गिरीश महाजन तसेच चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.
शरद पवार गटाला धक्का? –
राज्यात राष्ट्रवादी-काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर जळगावात अजित पवार गटाची ताकद वाढत असल्याचे बोलले जात होते. मात्र, यामध्ये संजय गरूड हे जिल्ह्यात शरद पवार गटाचे महत्वाच्या नेत्यांपैकी एक असे मानले जात होते. दरम्यान, संजय गरूड यांचा समर्थकांसह भाजप प्रवेश हा शरद पवार गटाला मोठा धक्का असल्याचे सांगितले जात आहे.