अहमदनगर : ‘महाजन साहेबांचा व्हिडिओ जो आपल्या सर्वांसमोर आला, जर सर्व नेत्यांच्या मतदारसंघांत आपण गेलो तर काम फक्त कागदावर आहे. मलिदा मात्र मोठ्या प्रमाणात या सर्व नेत्यांनी खाल्लेला आहे’, अशा शब्दात राष्ट्रवादीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टिका केली.
नेमकं काय घडलं –
गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर मंत्री गिरीश महाजन यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील लिहा तांडा या गावातील हा व्हिडिओ आहे. डबके साचलेल्या रस्त्यांवरुन कार्यकर्त्याच्या दुचाकीवर बसून मंत्री गिरीश महाजन गेले. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता मंत्री गिरीश महाजन यांच्या मतदारसंघातील रस्त्यांची अवस्था इतकी वाईट असल्याची चर्चा होत असून त्यांच्यावर टीका केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला.
काय म्हणाले रोहित पवार –
माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की, आज महाराष्ट्रात आपण पाहिले तर भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. विकास जमिनीवर दिसत नाही. त्यामुळे महाजन साहेबांचा व्हिडिओ जो आपल्या सर्वांसमोर आला, जर सर्व नेत्यांच्या मतदारसंघांत आपण गेलो तर काम फक्त कागदावर आहे. मलिदा मात्र मोठ्या प्रमाणात या सर्व नेत्यांनी खाल्लेला आहे. त्यामुळे सामान्य लोकांना विकास म्हणून काही मिळालं नाही. सगळ्या नेत्यांचा फक्त व्यक्तीगत आणि कुटुंबाचा विकास, मित्रपरिवाराचा कॉन्टरॅक्टच्या माध्यमातून या सगळ्यांचा विकास झालेला बघितलेले आहे, या शब्दात आमदार रोहित पवार यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टिका केली.
व्हिडिओवर मंत्री गिरीश महाजन यांनी दिलं होतं स्पष्टीकरण –
व्हायरल झालेल्या व्हिडिओबाबत मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले की, तेथील सरपंचांच्या बहिणीचा मृत्यू झाला होता. त्यामुळे कार्यकर्त्याच्या मोटरसायकलवर बसून त्याठिकाणी गेलो. माझ्यासोबत इतरही कार्यकर्त्यांच्या गाड्या होत्या. मात्र, या सर्व घटनेचा विपर्यास केला जात आहे. पाऊस पडल्याने, त्या गावात कामं चालू आहेत. ते गाव 80 टक्के भाजपचे आहे. तिथं ग्रामपंचायत बॉडीही आमची आहे. पण एका गल्लीमध्ये पाणी साचल्याने तेथून आम्ही गाडी टाकली आणि आम्ही तेथून बाहेर निघालो, असे स्पष्टीकरण मंत्री गिरीश महाजन यांनी दिले.