पुणे : ‘चांगलं मेकअप करुन, उच्चभ्रू वर्गाप्रमाणे जायचं आणि सर्व पक्षाच्या कार्यक्रमात मटकायचं, एवढंच तिथे काम दिसत आहे. त्यांच्या जवळ पुण्यात ज्या घटना झालेल्या आहेत, त्या घटनांवर त्यांचा साधा चिकार शब्दही आलेला नाही,’ असे म्हणत राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली.
राज्यातील महिला अत्याचाराच्या विरोधात पुण्यात आज शरद पवार गटाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना रोहिणी खडसेंनी राज्याच्या कायदा व सुवस्थेवर बोट ठेवत रुपाली चाकणकरांवर जोरदार टिका केली.
काय म्हणाल्या रोहिणी खडसे –
महाराष्ट्रात महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. त्याचा निषेध करण्यासाठी आमचं आजचं हे आंदोलन होतं. गेल्या काही दिवसात अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. जेव्हा आपण टीव्ही चालू करतो, तेव्हा महिला अत्याचाराची घटना समोर येताना दिसते. पुणे तिथे काय उणे, असं आपण म्हणायचो. तसं आता म्हणायला लागतं, पुणे तिथे गुन्हेच गुन्हे झालेत की काय. कारण रोज गुन्हे होत आहेत. पुण्याचं आता गुन्हे नाव करायला काही हरकत राहिलेली नाही, असं म्हणावं लागेल.
आज संपूर्ण महाराष्ट्रात असा कोणताही जिल्हा नाही, जिथे महिला अत्याचाराच्या घटना होत नाहीत. आमच्या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारकडे एकच मागणी आहे की, जो शक्ती कायदा महाविकास आघाडीच्या काळात मंजूर झालेला आहे, त्या कायद्यात अशा काही तरतुदी केल्या होत्या, जेणेकरुन गुन्हेगारांवर आळा घालण्यासाठी मदत झाली असेल. तो शक्ती कायदा तीन-साडेतीन वर्ष झाले, अडगळीत पडला आहे. तो का मंजुर केला गेला नाही. हे प्रश्न अनुत्तरीत आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं मागतोय. त्याचबरोबर जेव्हा अशा घटना महाराष्ट्रात होतात, तेव्हा पोलीस यंत्रणा काय करते, पोलीस यंत्रणा कडक कार्यवाही का करत नाही, कारण अनेक ठिकाणी आपण पाहतोय की, गुन्हा नोंदवायला देखील अत्याचार झालेल्या महिलेला संघर्ष करावा लागतोय. ती घटना रेकॉर्डवर येऊ नये यासाठी दोन-दोन, चार-चार दिवस नमूद केल्या जात नाही. माझ्या माता भगिनींना 10-12 वर्षे न्याय मिळत नसेल, तर न्यायाला अर्थ राहत नाही, अशी खंतही रोहिणी खडसे यांनी व्यक्त केली.
रुपाली चाकणकरांवर जोरदार निशाणा –
यावेळी रोहिणी खडसे यांनी राज्य महिला आयोगावरही जोरदार टीका केली. त्याबाबत त्या म्हणाल्या की, चांगलं मेकअप करुन, उच्चभ्रू वर्गाप्रमाणे जायचं आणि सर्व पक्षाच्या कार्यक्रमात मटकायचं, एवढंच तिथे काम दिसत आहे. त्यांच्या जवळ पुण्यात ज्या घटना झालेल्या आहेत, त्या घटनांवर त्यांचा साधा चिकार शब्दही आलेला नाही. काल गुलाबराव पाटील यांनी जे वक्तव्य केलं, यावर त्या बोललेल्या नाहीत. स्वारगेटच्या प्रकरणात त्यांच्याच सत्ताधारी पक्षाच्या आमदाराचे सहकारी होते, त्याच्यावर त्या बोललेल्या नाहीत. अशा मंत्रिमंडळातील अनेक महिला अत्याचाराच्या घटना नोंद आहेत, त्यांच्या राजीनाम्याची त्या मागणी करणार नाहीत. त्यांना पाठीशी घालण्याचं काम त्या करतात म्हणजे त्या कुठल्यातरी एका पक्षा आहेत. त्या संपूर्ण महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा नाहीत. महिला आयोग म्हणजे फक्त सत्ताधारी पक्षाची बाजू घेणारे, असे म्हणत रोहिणी खडसे यांनी रुपाली चाकणकर यांचं नाव न घेता जोरदार टीका केली.