नवी दिल्ली, 25 जून : संसदेच्या पावसाळी अधिवेशनास सुरूवात झाली असून या अधिवेशाचा आज दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवशी मंत्री आणि काही खासदारांनी शपथ घेतल्यावर आज दुसऱ्यादिवशी देखील काही खासदारांनी शपथ घेतली. यामध्ये अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच निवडून आलेले निलेश लंके यांनी खासदार पदाची शपथ घेतली. लंके यांनी ही शपथ इंग्रजीतून घेतल्याने याची मोठ्या प्रमाणात चर्चा केली जात आहे.
निलेश लंकेंनी इंग्रजीतून घेतली शपथ –
अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके यांनी आज मंगळवारी लोकसभेत खासदारकीची शपथ घेतली. महाराष्ट्राच्या इतर खासदारांकडून मराठी भाषेत शपथ घेतली जात असताना निलेश लंके यांनी इंग्रजीत घेतल्याने ही शपथ चर्चेचा विषय ठरलीय. निलेश लंके यांनी इंग्रजी भाषेत घेतलेल्या या शपथेमुळे अहमदनगर लोकसभेतील राजकारणा येणाऱ्या काळात चांगलेच तापणार आहे.
View this post on Instagram
इंग्रजी भाषेवरुन हिणवले –
लोकसभा निवडणुकीत अहमदनगरमध्ये डॉ. सुजय विखे पाटील आणि निलेश लंके यांच्यात सामना रंगला होता. अटीतटीच्या ठरलेल्या या लढतीत महायुती तसेच महाविकास आघाडीकडून केला गेलेला प्रचार राज्यभरात चर्चेचा विषय ठरला होता. लोकसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या काळात डॉ. सुजय विखे पाटील यांनी निलेश लंके यांना इंग्रजी भाषेवरुन हिणवले होते.
सुजय विखेंनी दिले होते आव्हान –
सुजय विखे यांनी निलेश लंके यांच्यावर टीक करताना सांगितले होते की, मी जेवढी इंग्रजी बोलतो, तेवढी इंग्रजी समोरच्या उमेदवाराने पाठ करून जरी बोलून दाखवली तरी मी उमेदवारी अर्ज भरणार नाही. मेळाव्याच्या सुरुवातीला सुजय विखेंनी संसदेत इंग्रजीत केलेल्या भाषणाचा एक व्हिडीओ दाखवण्यात आला होता. याचा आधार घेत सुजय विखेंनी निलेश लंकेंनी इंग्रजी बोलण्याचे आव्हान दिले. महिनाभरात जरी त्यांनी हे इंग्रजीतील भाषण पाठ करून म्हणून दाखवावे, असे सुजय विखेंनी म्हटले होते.
निलेश लंकेंनी केला होता पलटवार –
निलेश लंके यांनी सुजय विखे यांचे आव्हान स्वीकारत त्यांना प्रत्युत्तर दिले होते. इंग्रजी ही केवळ एक भाषा असून ती शिकायची म्हटल्यास त्यामध्ये काय अवघड आहे, असे लंकेंनी त्यावेळी म्हटले होते. मात्र, आता संसदेत इंग्रजी भाषेत खासदारकीची शपथ घेऊन निलेश लंके यांनी विखे-पाटील यांना येणाऱ्या काळातील राजकीय आव्हान उभे केले आहे.
हेही वाचा : IAS Ayush Prasad Interview : लासगाव बरडी सोलर प्रकल्प, जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद काय म्हणाले?