मुंबई, 6 जुलै: राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई, ठाणे, पालघर, पुणे आणि कोकणातील अनेक भागांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले असून घरांमध्येही पाणी शिरल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला असून अनेक मार्गांवर संथ गतीने वाहतूक सुरू आहे.
या पावसादरम्यान घडलेल्या विविध दुर्घटनांमध्ये राज्यात आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. भिंत कोसळण्याच्या घटनांमध्ये आठ जणांचा मृत्यू झाला, तर झाड कोसळून एका व्यक्तीचा जीव गेला आहे.
मुंबई उपनगरात भिंत कोसळल्यामुळे सहा जणांचा मृत्यू झाला आहे. पुणे आणि ठाणे येथे प्रत्येकी एका व्यक्तीचा भिंत कोसळून मृत्यू झाल्याची नोंद आहे. याशिवाय मुंबई उपनगरात झाड पडल्याने आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
मानखुर्द दुर्घटनेत सहा जणांचा बळी –
मुंबईतील मानखुर्द परिसरात एका तीन मजली चाळीचा काही भाग कोसळून भीषण दुर्घटना घडली. धोकादायक घोषित करण्यात आलेल्या या इमारतीतील रहिवासी घरातील सामान हलवत असताना अचानक इमारतीचा भाग कोसळला. या दुर्घटनेत पाच लहान मुले आणि एका महिलेचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला. या प्रकरणी मानखुर्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.
पालघरमध्ये नद्या धोक्याच्या पातळीवर तर इंद्रायणी नदीला पूर –
पालघर जिल्ह्यातही मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. वैतरणा, तानसा, सूर्या, देहेरजा आणि पिंजाळ या नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. तानसा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून वैतरणा नदीही धोक्याच्या पातळीवर पोहोचली आहे. तसेच सततच्या पावसामुळे पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे इंद्रायणी नदीला पूर आला आहे. सकाळपासून जोरदार पाऊस झाल्यानंतर सध्या पावसाचा वेग काहीसा कमी झाला असला तरी नदी दुथडी भरून वाहत आहे. मंदिर परिसरातही पाणी साचले आहे.
राज्यातील स्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचे नागरिकांना महत्वाचे आवाहन –
मुंबईसह किनारी भागातील जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग ५० ते ७० किलोमीटर प्रति तास असण्याची शक्यता आहे. यासोबतच आज दुपारी ३ ते ४.३० वाजे दरम्यान समुद्राला भरती येण्याची शक्यताही आहे. या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित यंत्रणांनी २४ बाय ७ अलर्ट मोडवर राहून आपत्कालीन परिस्थिती आल्यास तातडीने मदत कार्य करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. राज्यभरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने आज आणि उद्या अत्यावश्यक काम असल्याशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये , असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.
हेही वाचा: पावसाच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणा 24 बाय 7 ‘अलर्ट मोड’वर ठेवा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस






