मुंबई : दादरमधील तब्बल 80 वर्षे जुने हनुमान मंदिर पाडण्यासाठी रेल्वे विभागाने नोटीस बजावली होती. यावरुन राज्यातील महायुती सरकारवर उद्धव ठाकरे यांनी काल जोरदार टीका केली होती. ‘एक है तो सेफ है म्हणतात, पण मंदिरही सेफ नाहीत’, अशी टीका करत उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला होता. ठाकरेंच्या टीकेला भाजपनेही जोरदार प्रत्युत्तर दिले होते. तसेच आज आदित्य ठाकरे हे या दादर येथील हनुमान मंदिरात महाआरती करणार होते. मात्र, याआधीच मंदिराला मिळालेल्या नोटीसीला रेल्वेकडून स्थगिती देण्यात आली आहे.
हनुमान मंदिराला आलेल्या नोटीसबाबत भाजपचे ज्येष्ठ आमदार मंगल प्रभात लोढा यांनी माहिती घेतली आणि रेल्वेमंत्र्यांशी चर्चा करून नोटीसीला स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे या हनुमान मंदिरात नित्यपूजा आणि आरती सुरूच राहील, अशी माहिती मंगल प्रभात लोढा यांनी दिली.
माध्यमांशी बोलताना मंगलप्रभात लोढा म्हणाले की, विश्व हिंदू परिषद आणि आमचे सर्व बजरंग दलाचे पदाधिकारी हे केंद्राशी संपर्कात होते. मी आमच्या पदाधिकाऱ्यांसह या ठिकाणी आलो आहे. आम्ही जनरल मॅनेजर आणि केंद्रीय रेल्वेमंत्र्यांशी याबाबत चर्चा केली आहे. तसेच काल आमचे मंडळ रेल्वे अधिकाऱ्यांना भेटले होते. त्यामुळे या नोटीसीवर आता स्टे ऑर्डर काढण्यात आली आहे.
आदित्य ठाकरेंसाधला निशाणा –
पुढे बोलताना ते म्हणाले की, मंदिराच्या विषयांमध्ये राजकारणाविषयी मी काही बोलू इच्छित नाही. या ठिकाणी स्टे मिळाल्यानंतर कशाला कोणी आरती केली पाहिजे? धार्मिक विषयात राजकीय वळण आणू नये, या शब्दात त्यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. मंदिराला काहीही होणार नाही. मंदिर आहे त्याच ठिकाणी राहणार आहे. जे मंदिर जुने आहे, त्याला कोणीही पाडणार नाही. सर्व मंदिर वाचवण्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या ठिकाणी आहे. निर्णयाची स्टे ऑर्डर माझ्याकडे आलेली आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
आदित्य ठाकरे करणार महाआरती?
दरम्यान, रेल्वेने दिलेल्या नोटीसीनंतर आज सायंकाळी दादरच्या हनुमान मंदिरात आरती करण्यासाठी आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, आमदार महेश सावंत यांच्यासह हजारो शिवसैनिक जाणार आहेत. मात्र, या महाआरती आधीच रेल्वेने मंदिराला मिळालेली नोटीस स्थगित केली आहे. त्यामुळे आता आदित्य ठाकरे मंदिरात महाआरती करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.