ईसा तडवी, प्रतिनिधी
वरखेडी, ता.पाचोरा : पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथे बैल पोळ्याच्या (14 सप्टेंबर) दिवशी रात्री वृद्ध संतोष दगडू भोई (वय 73) यांच्यासोबत वाद घालत त्यांना लाठ्यांनी जबर मारहाण केल्याची घटना घडली होती. संतोष भोई या घटनेत जखमी झाल्याने त्यांना पाचोरा येथील विघ्नहर्ता रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोमवार (18 सप्टेंबर) संतोष भोई यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, पोलिसांनी या घटनेतील तीन आरोपींना अटक केली.
खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी रवींद्र सखाराम भोई, प्रकाश भोई,धना भोई अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आज त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
नेमकं काय आहे प्रकरण? –
वरखेडी ता.पाचोरा यागावी बैल पोळ्याच्या दिवशी संतोष दगडू भोई वय वर्षे (७३) हे रात्री आठ वाजेच्या सुमारास त्यांच्या घरासमोर खाट टाकून झोपलेले होते. याचवेळी रविंद्र सखाराम भोई हे त्यांचा बैल पळवत असतांना त्यांच्या बैलाचा धक्का घरासमोर झोपलेल्या संतोष भोई याच्या खाटेला लागला. अचानक धक्का लागल्याने संतोष भोई हे ओरडून उठले त्यांच्या ओरडण्याचा रविंद्र भोई यांना राग आल्याने रविंद्र सखाराम भोई यांनी प्रकाश भोई, धना भोई यांना बोलावून घेऊन सर्वांनी मिळून संतोष दगडू भोई यांच्याशी वाद घालून संतोष भोई यांना लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली होती.
दरम्यान, या मारहाणीत संतोष भोई यांच्या पाठीवर, हातावर व डोक्याला जबर दुखापत झाल्याने त्यांना तातडीने पाचोरा येथील विध्नहर्ता रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यावेळी संतोष भोई यांनी पाचोरा येथे दिलेल्या जबाबावरुन पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 255/2023 भादंवी कलम 323,34 अन्वये दिनांक 17 सप्टेंबर 2023 रविवार रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा तपास पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय वेरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र वाघमारे व त्यांचे सहकारी करीत आहे.