नागपूर, 14 डिसेंबर : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनाची आज सांगता झाली. दरम्यान, विरोधी पक्षातील नेत्यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषद घेत सरकार जोरदार टीका आरोप केलाय. हिवाळी अधिवेशनात विदर्भाला न्याय मिळेल, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज जाहीर होईल तसेच संत्रा, कापूस आणि धान उत्पादकांना दिलासा दिला जाईल, अशा अपेक्षा होत्या. मात्र, या सर्व अपेक्षा धुळीस मिळाल्या असून अधिवेशन केवळ 75 हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यापुरतेच मर्यादित राहिले, असा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. तसेच जे करार होतात तशी गुंतवणूक प्रत्यक्षात होत नाही, असा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेल्या घोषणांमुळे हे अधिवेशन ‘जुमला’ ठरल्याचा आरोप त्यांनी केला.
हिवाळी अधिवेनशानंतर विरोधकांची सरकारवर जोरदार टीका –
हिवाळी अधिवेशनाची सांगता झाल्यानंतर दुपारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते भास्कर जाधव, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत सरकारवर टीकेची झोड उठवली. यासोबतच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशनातीलच भाषण नागपूरच्या अधिवेशनात पुन्हा वाचून दाखवले, असा टोलाही यावेळी विरोधकांनी लगावला.
विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना ठोस उत्तरे देण्याऐवजी सरकारकडून जुन्याच योजनांचा उल्लेख करण्यात आला. कोट्यवधी रुपयांच्या प्रकल्पांची आकडेवारी सांगण्यात आली; मात्र या आकड्यांची बेरीज केली तर ती थेट देशाच्या एकूण अर्थसंकल्पापेक्षा जास्त होते, असा आरोपही यावेळी करण्यात आला.
विदर्भातील जनतेला गृहीत धरून सरकारकडून फसवणूक –
भास्कर जाधव यांनी सांगितले की, सरकारने 15 ते 20 निवेदने स्वीकारली असली तरी त्यामध्ये विदर्भाशी संबंधित एकही निवेदन नव्हते. मुंबई आणि इतर महापालिकांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच बहुतांश घोषणा करण्यात आल्या असून सर्वाधिक घोषणा मुंबईसाठीच होत्या. किमान ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल, अशी अपेक्षा होती; मात्र, सरकारने विदर्भातील जनतेला गृहीत धरून फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी केला.
हिवाळी अधिवेशन ठरले ‘जुमला’ –
काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, धान उत्पादकांसाठी बोनसची मागणी करण्यात आली होती, मात्र तीही सरकारने फेटाळली. संत्रा, कापूस आणि मोसंबीबाबत साधा उल्लेखही अधिवेशनात करण्यात आला नाही. महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेल्या घोषणांमुळे हे अधिवेशन ‘जुमला’ ठरल्याचा आरोप त्यांनी केला.
करारानुसार प्रत्यक्षात गुंतवणूक होत नाही –
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील म्हणाले की, सरकारने दावोस येथे झालेल्या करारांची केवळ आकडेवारी वाचून दाखवली. प्रत्यक्षात विदर्भात किती गुंतवणूक झाली, किती उद्योग सुरू झाले आणि किती रोजगारनिर्मिती झाली, याबाबत मात्र कोणतीही स्पष्ट माहिती दिली नाही. उद्योग विभागाकडून मागवलेल्या माहितीतही कराराच्या वेळी जाहीर केलेलेच आकडे देण्यात आल्याचे सांगत, कागदोपत्री माहितीच्या आधारे जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला.
हेही वाचा : यंदाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनात विधानसभेत नेमकं किती कामकाज झालं, संपूर्ण कामकाजाची माहिती एका क्लिकवर…






