ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 8 ऑक्टोबर : मागील महिन्यात पुरामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई राज्यातील 247 तालुक्यांना सरसकटपद्धतीने देण्यात येणार आहे. यामध्ये पाचोरा आणि भडगाव तालुक्याचा देखील समावेश करण्यात आला आहे. यामुळे दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना भरपाई मिळणार असल्याचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी सांगितले. दरम्यान, शासनाने भरपाईच्या रकमेत मोठी वाढ केली असून आजपर्यंतची सर्वात मोठी भरपाई शेतकऱ्यांना मिळणार असल्याने त्यांनी शासनाच्या या निर्णयाचे आभार मानले आहे.
पाचोरा-भडगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान –
गेल्या महिन्यात पाचोरा व भडगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकाचे पुर्णत: नुकसान झाले. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीने दोन्ही तालुक्यातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत. पाचोरा तालुक्यात काही भागात जमीनी खरडून गेल्या. जनावरे दगावली, घरे जमिनदोस्त झाली. ही परीस्थीती उद्भवल्याने रब्बी हंगाम कसा पेरायचा, असा प्रश्न देखील शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.
आमदार किशोर आप्पा पाटील यांचा पाठपुरावा यशस्वी –
पाचोरा-भडगाव तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती आमदार किशोर आप्पा पाटील यांनी शासन दरबारी मांडली. पाचोरा आणि भडगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यासह शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी देखील त्यांनी केली. याबाबतचे निवदेन त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील तसेच कृषीमंत्री दत्ता भरणे यांना दिले होते.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काल पत्रकार परिषदेत राज्यातील 247 तालुक्यांना सरसकटपद्धतीने देण्यात येणार असल्याचे जाहीर केले. यामध्ये पाचोरा आणि भडगाव तालुक्याचा समावेश करण्यात आल्याने आमदार किशोर आप्पा पाटील यांचा पाठपुरावा यशस्वी झाल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत.
‘सरकारने शेतकऱ्यांना न्याय दिला’ –
अतिवृष्टीने खरीप हंगाम पुर्णत: उध्वस्त झाला. त्याची परीस्थिती पाहून माझ्याही डोळ्यात पाणी आले होते. शेतकऱ्यांच्या नुकसानीची वस्तुस्थिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, कृषीमंत्री दत्तामामा भरणे यांच्याकडे मांडली. त्यांनी दोन्ही तालुक्याचा समावेश सरसकट भरपाईच्या यादित केल्याने खऱ्याअर्थाने शेतकऱ्यांना न्याय दिला आहे, अशी प्रतिक्रिया आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली.