ईसा तडवी, प्रतिनिधी
नगरदेवळा (ता. पाचोरा) : पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथे अल-खिदमत फाउंडेशनच्या वतीने प्रथमच सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. मुस्लिम शादी हॉल, आजाद नगर येथे पार पडलेल्या या सोहळ्यात पाच जोडप्यांचा विधिवत विवाह संपन्न झाला.
कार्यक्रमास आमदार किशोर पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, नगरदेवळा ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रतिक्षा किरण काटकर, पाचोरातील अबुलेस हाजी अलाउद्दीन शेख, तसेच हाजी जाकिर अ. लतीफ (मालेगाव) व सैय्यद अयाज अली नीयाज अली (जळगाव) आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी आमदार किशोर आप्पा पाटील म्हणाले, “सामूहिक विवाह सोहळ्यांतून समाजात एकात्मतेचा संदेश पोहोचतो. विवाहावर होणारा अनावश्यक खर्च टाळण्यासाठी अशा उपक्रमांना प्रोत्साहन दिले पाहिजे. वाचलेला पैसा संसार उभारण्यासाठी उपयोगी पडतो.”
कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी फाउंडेशनचे पदाधिकारी सुफियान शेख, फरीद खान, अनीस बागवान, दानिश सैय्यद, अबरार खान आणि इतरांनी प्रयत्न केले. उपस्थित सर्व मान्यवरांनी अल-खिदमत फाउंडेशनच्या या उपक्रमाचे कौतुक केले.






