ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 28 ऑक्टोबर : पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेच्या वाटेला आल्यानंतर भाजपचे अमोल शिंदे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, त्यांनी आज अपक्ष उमेदवार म्हणून आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी अमोल शिंदे यांची त्यांच्या समर्थकांसह पाचोऱ्यात मोठी रॅली निघाली.
अमोल शिंदे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून केला अर्ज दाखल –
अमोल शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पाचोऱ्यात रॅलीचे आयोजन करण्यात आले. पाचोरा शहरातील भारत डेअरी चौफुली येथून या रॅलीला सुरुवात होऊन मारुती मंदिर व सप्तशृंगी माता मंदिर कृष्णापुरी – आठवडे बाजारात (परिवर्तन सभा)- गांधी चौक – जामनेर रोड मार्गे – छत्रपती शिवाजी महाराज चौकात रॅलीची सांगता झाली. यावेळी अमोल शिंदे यांच्या समर्थकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. तत्पुर्वी, अमोल शिंदे यांनी रॅलीसाठी उपस्थित असलेल्या समर्थकांना संबोधित केले. यावेळी त्यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धींवर जोरदार टीका केली.
पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघ –
पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत शिवसेनेचे विद्यमान आमदार किशोर आप्पा पाटील यांनी मोठ्या शक्तीप्रदर्शनासह उमेदवारी अर्ज दाखल केला. यासोबतच ठाकरे गटाकडून वैशाली सुर्यवंशी यांनी तर अपक्ष म्हणून माजी आमदार दिलीप वाघ, अपक्ष उमेदवार उत्तमराव महाजन यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तसेच उद्या 29 ऑक्टोबर रोजी निलकंठ पाटील हे देखील अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणार आहेत. तर प्रतापराव हरी पाटील हे देखील महाराष्ट्र स्वराज्य पक्षातर्फे निवडणूक लढवत आहेत. दरम्यान, अपक्ष उमेदवार म्हणून अमोल शिंदे हे देखील निवडणुकीच्या मैदानात असल्याने पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाची निवडणूक ही रंगतदार होणार आहे.
हेही वाचा : Breaking : शिवसेना ठाकरे गटाने चोपड्याचा उमेदवार बदलला, कुणाला मिळाली संधी?