ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 22 सप्टेंबर : जळगाव जिल्ह्यात काल रात्रीपासून सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू असून पाचोऱ्यातील हिवरा नदीला पूर आलाय. हिवरा नदीकाठच्या भागातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, आमदार किशोर आप्पांनी आज सकाळी पाचोरा शहरातील विविध भागांत पाहणी करत नागरिकांसोबत संवाद साधत धीर दिला. तसेच नुकसानीचे पंचानामे करण्याच्या सूचना देखील प्रशासनास आमदार पाटील यांनी दिल्या.
आमदार किशोर आप्पांनी केली पाहणी –
डोंगरमाथ्यात जोरदार पाऊस झाल्याने हिवरा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलाय. या पार्श्वभूमीवर आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आज पाचोरा शहरातील कृष्णापुरी, श्रीराम मंदिरातील परिसर, शिवाजीनगर, कोंडवाडा गल्ली, आठवडे बाजार, मुल्ला वाडा, मच्छिबाजार नागसेन नगर, बहिरम नगर तसेच जनता वसाहत या परिसरात पाहणी केली.
आमदारांनी नागरिकांना दिला धीर –
हिवारा नदीत आलेल्या पुरामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने आमदार किशोर आप्पा पाटील यांनी नागरिकांना धीर देत सुरक्षित स्थळी जाण्याचं आवाहन केलं. तुमची जवळच्या शाळेत सोय करण्यात आली असून तुम्ही त्याठिकाणी जावं आणि पुढील कार्यवाही साठी प्रशासनास योग्य त्या सूचना देण्यात आल्याचे आमदार पाटील यांनी नागरिकांसोबत बोलताना सांगितले.
View this post on Instagram
पाचोऱ्यात हिवरा नदीला पूर –
पाचोरा तालुक्यात रात्रीपासून जोरात पाऊस सुरू आहे. यामुळे तालुक्यातील बहुळा हिवरा व आगनावती मध्यम प्रकल्प तसेच म्हसाळा(कोकडी) सार्वेपिंप्री, सातगाव डोंगरी, गहुला, पिंपळगाव कोल्हे, सार्वा-खाजोळा, बदरखा, गाळण, तारखेडा,कळमसरा हे लघु प्रकल्प सुद्धा पूर्ण भरले आहेत.तसेच त्यातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. तसेच शिंदाड, अंतुर्ली (बुवाची), गिरड आदी गावांसह पाचोरा तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याचे दिसून येत आहे.
नागिराकांनी काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन –
पाचोरा तालुक्यातील काल रात्रीपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे आज सकाळपासून हिवरा 8000, अग्नावती 4000 आणि बहुळा 1500 क्यूसेक्स पाणी या नदीपात्रात वाहत आहे. दरम्यान, ते आणखी वाढण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, नदीकाठच्या लोकांनी सतर्कता बाळगावी तसेच नदीपात्रात जाऊ नये अन् गुरेढोरे बांधू नये, असे आवाहन पाचोरा पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी प्रवीण टी. पाटील यांनी केले आहे.






