ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा : प्रत्येक एका व्यक्तीने जर 100 शिवसैनिकांना जोडले तर महाराष्ट्रात पाचोरा-भडगाव मतदारसंघ हा सर्वात टॉपचा सभासद नोंदणीमध्ये बनेल. त्यामुळे महाराष्ट्रात सर्वात जास्त शिवसैनिक आपण करू दाखवली असे शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेबांसमोर आपल्याला ठामपणे सांगण्याचा बहुमान मिळेल, असा विश्वास आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आज व्यक्त केला.
विधानसभेच्या निवडणुकीनंतर आज पहिल्यांदाच शिवसेनेची बैठक आयोजित करण्यात आली होती. शिवकार्य सदस्य नोंदणीच्या माध्यमातून संघटनेला पुन्हा चालना देण्यासाठी ही बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी यावेळी सांगितले. पाचोरा येथील शिवालय या कार्यालयात ही बैठक पार पडली.
काय म्हणाले आमदार किशोर आप्पा पाटील –
या बैठकीत आमदार किशोर आप्पा पाटील म्हणाले की, महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून पदाधिकारी, कार्यकर्ते हे शिवसेनेत मोठ्या संख्येने प्रवेश करत आहेत. त्यामुळे आज खरी शिवसेना कोणती आहे तर ती आपली म्हणजे शिंदे साहेबांचीच शिवसेना खरी आहे, हे सिद्ध झालेले आहे. हीच खरी बाळासाहेबांनी स्थापन केलेली शिवसेना आहे, हे चित्र आता आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रभर पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात विधानसभेला इतकं बहुमत कुणालाही मिळालेलं नाही. त्यामुळे हीच खरी शिवसेना आहे, हे महाराष्ट्रातील जनतेने सिद्ध केले.
पुढे ते म्हणाले की, जे पूर्वीपासून आपण शिवसेनेचे काम करत होतो तेच काम आता पुन्हा हाती घेऊन आपल्याला जोमाने कामाला लागायचे आहे. प्रत्येक एका व्यक्तीने जर 100 शिवसैनिकांना जोडले तर महाराष्ट्रात पाचोरा-भडगाव मतदारसंघ हा सर्वात टॉपचा सभासद नोंदणीमध्ये बनेल. त्यामुळे महाराष्ट्रात सर्वात जास्त शिवसैनिक आपण करू दाखवली असे शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेबांसमोर आपल्याला ठामपणे सांगण्याचा बहुमान मिळेल. तसेच प्रत्येक गावात शिवसेना सभासद नोंदणीचे बॅनर लावण्यात येतील, अशी माहितीही आमदार किशोर आप्पा पाटील यांनी यावेळी दिली.
या बैठकीला उपजिल्हाप्रमुख किशोर बारावकर, तालुकाप्रमुख सुनील पाटील, शहरप्रमुख सुमित सावंत, मुंबईहून आलेले गौरवजी आणि त्यांचे सहकारी, सर्व शिवसेना महिला आघाडी, युवासेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.