ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 7 ऑक्टोबर : पाचोरा शहरातील एस.एस.एम.एम महाविद्यालयाची माजी विद्यार्थी युगंधरा राजेंद्रसिंग पाटील ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत सहाय्यक विक्रीकर निरिक्षक पदासाठी महाराष्ट्र राज्यातून EWS वर्गातून महिलांमधून प्रथम क्रमांकाने तर सहाय्यक कक्ष अधिकारी या पदासाठी महाराष्ट्र राज्यातून द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. तर साकेत सोनार याने कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात रु.12,50,000/- रूपये मिळवून यश संपादन केले आहे.
यानिमित्त पाचोरा शहरातील एस.एस.एम.एम महाविद्यालयात युगंधरा पाटील आणि साकेत नंदकुमार सोनार यांचा 6 ऑक्टोबर रोजी माजी विद्यार्थी संघाच्या वतीने पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन व्हि.टी जोशी हे होते.
याप्रसंगी युगंधरा पाटील हिने महाविद्यालयातील विद्यार्थी मार्गदर्शन करताना सांगितले की, आपण सोशल मीडियाचा वापर योग्य ठिकाणी केला पाहिजे. दिवसभर त्याच्यामध्ये गुंतून न राहता अभ्यासासाठी मोबाईल कम्प्युटर यांचा आधार घ्यावा. याबरोबरच उपलब्ध पुस्तके भरपूर वाचन केले पाहिजे. तसेच आपल्या यशाचा बी प्लॅन प्रत्येकाने तयार करून ठेवावा, जेणेकरून आपण ज्या वर्गात शिकत आहोत तिथून मिळणारे यश व आपल्याला स्पर्धा परीक्षेतून मिळविणाऱ्या यश यासाठीचे आपल्या आयुष्याचे गोल आपण ठरविले पाहिजे आणि यश संपादन केले पाहिजे.
दरम्यान, संस्थेने आमच्या महाविद्यालयाचे ग्रंथालय समृद्ध ठेवले असून विद्यार्थ्यांना विविध सुख सुविधा उपलब्ध करून दिलेले आहेत तसेच विविध परीक्षांच्या अभ्यासासाठीची साधने ग्रंथालयात उपलब्ध असून महाविद्यालयाचे क्रीडांगण हे विद्यार्थ्यांच्या शारीरिक सुदृढतेसाठी महत्त्वाचे असून महाविद्यालयाचे क्रीडांगण हे समृद्ध आहे त्याचा फायदा मला घेता आला, असे सांगत पा. ता.सह.शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार दिलीप वाघ, चेअरमन संजय वाघ यांचे युगंधराने विशेष आभार मानले.
तसेच साकेत सोनार यानेही पाचोरा ते कौन बनेगा करोडपती पर्यंतचा आपला प्रवास मनोगतातून मांडला. इंजिनिअरिंग बरोबर समाजशास्त्राचा अभ्यास करून दैनंदिन घडामोडी नवनवीन वर्तमानपत्रांमधून माहिती मिळून खान्देशातील अहिराणी ते जर्मन भाषेपर्यंत भाषा शिक्षणाचा त्याने वृत्तांत मांडला. दोन्हीही यशस्वी विद्यार्थ्यांचा परिचय आणि त्यांनी मिळवलेले यश याबद्दल माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष प्रा.राजेंद्र चिंचोले यांनी करून दिला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले संस्थेचे व्हाईस चेअरमन नानासाहेब व्हि.टी जोशी यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालय व संस्था परिवार सदैव तत्पर आहे व भविष्यातही राहील. तसेच विद्यार्थ्यांना यश संपादन करण्यासाठी सतत प्रेरणा देत राहील व यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसमोर करून एक नवी प्रेरणा नवीन विद्यार्थ्यांना मिळेल. यासाठी नेहमी संस्था परिवाराच्या वतीने प्रयत्न करू, असे आश्वासन देऊन गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला.
या तसेच कार्यक्रमात महाविद्यालयातील इंग्रजी विभागाचे प्राध्यापक रोहित पवार व डॉ.दिनेश पाटील (शेंदुर्णी कॉलेज) यांनी प्रथम वर्ष साहित्य वर्गासाठी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे संचालक खलील देशमुख, माजी विद्यार्थी संघाचे पदाधिकारी सुधीर पाटील, विश्वास साळुंखे, अंबादास शिंपी, प्रा.डॉ दीपक मराठे महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.वासुदेव वले, उपप्राचार्य डॉ.जे व्हि.पाटील, माजी विद्यार्थी संघाचे सचिव प्रा डॉ.जे. डी. गोपाळ, महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. माणिक पाटील यांनी केले तर आभार प्रा.डॉ.के एस इंगळे यांनी मांनले.