सुनिल माळी, प्रतिनिधी
पारोळा/जळगाव, 25 एप्रिल : जळगाव येथे आज महायुतीच्या उमेदवारांच्या अर्ज भरण्याच्या प्रसंगी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. दरम्यान, या जाहीर सभेत पारोळा माजी नगराध्यक्ष गोविंद एकनाथ शिरोळे यांनी भाजपात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला.
पारोळ्याचे गोविंद शिरोळे भाजपात –
महायुतीच्या उमेदवारांनी आज लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केले. यानंतर आयोजित करण्यात आलेल्या सभेत पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष गोविंद एकनाथ शिरोळे, डॉ स्वप्निल चंद्रकांत शिरोळे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आपत्ती व्यवस्थापन तसेच मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
जळगावात महायुतीचे शक्तीप्रदर्शन –
महायुतीच्या उमेदवारांच्या अर्ज भरण्याच्या पार्श्वभूमीवर जळगावात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, या रॅलीनंतर महायुतीच्या उमेदवारांनी जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केले. यामध्ये जळगाव लोकसभा मतदारसंघातून स्मिता वाघ तर रावेर लोकसभा मतदारसंघातून रक्षा खडसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
हेही वाचा : महाविकास आघाडीचे शक्तीप्रदर्शन : जळगावमधून करण पवार तर रावेरमधून श्रीराम पाटील यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल