चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
मुंबई, 17 मे : लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात आतापर्यंत निवडणुकीचे चार टप्पे पार पडले असून 20 मे रोजी शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. यामध्ये मुंबईतील मतदारसंघांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांनी सभांचा धडाका लावला आहे. दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले असून या सभेत मनसे प्रमुख राजे ठाकरे हे देखील उपस्थित राहणार आहेत.
राज्यातील इतिहासात पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर –
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज शिवाजी पार्कवर जाहीरसभा आयोजित करण्यात आली आहे. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात ही सभा पार पडत असल्याने ती महत्वाची मानली जात आहे. दरम्यान, या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे हे एका व्यासपीठावर येणार आहे. पंतप्रधान मोदी-राज ठाकरे एका व्यासपीठावर येण्याची ही राज्यातील पहिलीच वेळ आहे. यापुर्वी राज ठाकरे यांनी गुजरात दौरा केला होता. त्यावेळे ते दोघे एकत्र आले होते.
मुंबईतील 6 जागांसाठी मतदान –
मुंबई परिसरात एकूण 6 लोकसभा मतदारसंघ आहेत. यासाठी निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजेच 20 मे सोमवार रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता मुंबईत प्रचार तोफा थंडावणार आहेत. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे भव्य आयोजन करण्यात आले. दरम्यान, महायुतीतील नेत्यांकडून या शेवटच्या टप्प्यात विरोधकांवर नेमका काय निशाणा साधला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.