चद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
सातारा, 29 एप्रिल : सातारा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये ही सभा पार पडली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. विरोधकांकडून आमचे फेक व्हिडिओ पसरवले जात असल्याचा देखील आरोप नरेंद्र मोदी यांनी केला. संविधान बदलण्याच्या मुद्यावरूनही त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
काय म्हणाले नरेंद्र मोदी? –
गेल्या काही दिवसांपासून भाजपचा 400 पारचा नारा, हा देशाचे संविधान बदलण्यासाठी असल्याचा गंभीर आरोप इंडिया आघाडीकडून तसेच देशातील विविध सामाजिक संघटनांकडून केला जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधानाचा मुद्दा उपस्थित करत मी जिवंत असेपर्यंत संविधान बदलू देणार नाही, असे स्पष्ठ केले.
‘आमचे फेक व्हिडिओ पसरवले जात आहेत’ –
बाबासाहेबांचे संविधान त्यांनी (काँग्रेस) जम्मू-काश्मीरमध्ये लागू केले नाही. त्या ठिकाणी असलेल्या दलित, आदिवासी समाजाला त्याचा लाभ घेऊ दिला नाही, असा आरोप पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर केला. आम्ही मात्र, जम्मू-काश्मीरमध्ये 370 कलम रद्द केली. आमचे फेक व्हिडिओ पसरवले जात आहेत, कधी माझा आवाज, कधी अमित भाईंचा आवाज तर कधी नड्डा यांचा आवाजामध्ये व्हिडिओ पसरवत जात आहेत, अशी टीका त्यांनी केली. हे व्हिडिओ आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून पसरवले जात असून त्याला बळी पडू नका, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केले.
‘मोदींना दैवी शक्ती प्राप्त’ –
कराडमधील जाहीर सभेत महायुतीचे उमेदवार उदयनराजे यांनी पंतप्रधान मोदींचे स्तुती करत मोदींना दैवी शक्ती प्राप्त असल्याचे त्यांनी सांगितले. उदयनराजे म्हणाले की, देशात नव्हे तर जगभरात सर्वात मोठा पक्ष म्हणजे भाजप आहे. काँग्रेसने या आधी फक्त सत्ता भोगली आणि लोकांची कामं केली नाहीत, पण पंतप्रधान मोदी सत्तेत आले आणि त्यांनी शेतकरी आणि मजुरांसाठी अनेक योजना लागू केल्या, नरेंद्र मोदी यांना दैवी शक्ती लाभली आहे, त्यांच्या कामात अनेक बारकावे असतात, अशी स्तुतीसुमने उदयनराजेंनी उधळली.