नवी दिल्ली, 22 डिसेंबर : महाराष्ट्रातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींचा निकाल आज जाहीर झाला असून या निवडणुकांमध्ये महायुतीने विरोधकांना जोरदार धक्का देत दणदणीत विजय मिळवला आहे. महायुतीने 200 पेक्षा अधिक नगरपालिका व नगरपरिषदांवर आपले वर्चस्व प्रस्थापित करत राज्यातील शहरी भागात आपली पकड अधिक मजबूत केली आहे.
या निवडणुकीत एकट्या भारतीय जनता पक्षाचेच 100 हून अधिक नगराध्यक्ष निवडून आले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील हा विजय आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा संकेत मानला जात आहे. महायुतीच्या या यशामुळे विरोधी पक्षांमध्ये अस्वस्थता वाढली असून, अनेक ठिकाणी पारंपरिक राजकीय समीकरणे बदलल्याचे चित्र दिसून आले.
दरम्यान, या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानत, हा विजय लोकांच्या विश्वासाचा आणि विकासाच्या धोरणांचा असल्याचे म्हटले आहे. त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमधूनही विकासाची गती कायम ठेवण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदारांचे मराठीतून मानले आभार –
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’ पोस्टमध्ये म्हटलंय की, महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे! नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत भाजपा आणि महायुतीवर विश्वास दाखवल्याबद्दल मी महाराष्ट्रातील जनतेचा ऋणी आहे. आमच्या लोक-केंद्रित विकासाच्या दृष्टीकोनावर जनतेने दाखवलेल्या विश्वासाचे हे प्रतिबिंब आहे. आम्ही राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी नव्या ऊर्जेने काम करण्यासाठी वचनबद्ध आहोत. भाजपा आणि महायुतीच्या तळागाळापर्यंत मेहनत घेतलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे मी कौतुक करतो.
राज्यातील नगरपरिषद/नगरपंचायतींचा निकाल –
महायुती – 207 जागा
- भाजप – 117
- शिवसेना (शिंदे गट) – 53
- राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) – 37
महाविकास आघाडी – 44 जागा
- काँग्रेस – 28
- शिवसेना (ठाकरे गट) – 9
- राष्ट्रवादी क्राँग्रेस (शरद पवार गट) 7
- इतर – 37
हेही वाचा : मतदारांचा कौल चर्चेत! जळगाव जिल्ह्यातील ‘या’ सात नगरपरिषदेत धक्कादायक निकाल, वाचा Special Report






