जळगाव, 9 ऑक्टोबर : मान्सूनच्या परतीच्या पावसाने सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस राज्यात सर्वत्र हजेरी लावल्यानंतर पुढील काही दिवस पुन्हा एकदा पावसाचे सावट आहे. हवामान विभागाच्या अंदाजनुसार, राज्यात पुढील काही दिवस जोरदार पाऊस होण्याची शक्यता असून पुढील दोन ते तीन दिवस नैऋत्य मौसमी पाऊस गुजरात व मध्य प्रदेशचा काही भाग तसेच महाराष्ट्राच्या आणखी काही भागातून परतण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे.
राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट –
महाराष्ट्रातील चार उपविभागांमध्ये पुढील काही दिवस पावसाचे राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. कोकण, गोव्यामध्ये आज व उद्या काही ठिकाणी तर पुढील चार दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, अकोला, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट दिला असून वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
जळगाव जिल्ह्याचा हवामान अंदाज –
जळगाव जिल्ह्यात सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस मान्सूनच्या परतीच्या पावसाने चांगलंच झोडपले. यामध्ये जिल्ह्यातील विविध भागात समाधानकारक पाऊस झाला असून काही ठिकाणी शेतपीकांचे देखील नुकसान झाले. तसेच जिल्ह्यात असलेल्या धरणांच्या जलसाठ्यांत मोठी वाढ झाली आहे. दरम्यान, आता ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीपासून उन्हाच्या तापमानात वाढ झाली असताना पुढील काही दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे. तर काही ठिकाणी उन्हाचा पारा चढण्याची शक्यता आहे.
हेही पाहा : Video : महाराष्ट्राच्या नवदुर्गा : गुजरातमधील लिंबायतच्या आमदार, खान्देशकन्या Sangita Patil यांची मुलाखत