मुंबई, 10 सप्टेंबर : मागील वर्षी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत पाचोरा-भडगाव मतदारसंघात प्रताप हरी पाटील यांनी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाकडून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर अवघ्या 10 महिन्यातच प्रताप पाटील यांनी त्यांच्या कन्या पूनम पाटील यांच्यासह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.
मुंबईत प्रताप पाटील यांचा कन्येसह भाजपात प्रवेश –
राज्याचे जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानी प्रताप पाटील यांनी त्यांच्या कन्या पूनम पाटील यांच्यासह भाजपात प्रवेश केला. राज्याचे मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय भाऊ सावकारे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार विक्रांत पाटील,आमदार चित्राताई वाघ, माजी आमदार दिलीप वाघ, भाजपा नेते अमोल शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.
अन् अवघ्या 10 महिन्यातच भाजपात प्रवेश –
मागील वर्षी पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत प्रताप पाटील यांनी महाराष्ट्र जन स्वराज्य पक्षाकडून उमेदवारी दाखल केली होती. मात्र, त्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. तर दुसरीकडे प्रताप पाटील यांच्या कन्या पूनम पाटील ह्या जळगाव जिल्हा दूध संघाच्या संचालिका तसेच पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका आहेत. दरम्यान, प्रताप पाटील तसेच त्यांच्या कन्या पूनम पाटील यांनी आज भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश करत आपल्या राजकीय आयुष्याची नवीन सुरुवात केली आहे.
आमदारांच्या विरोधात निवडणूक लढवणारे तिघेही नेते भाजपात –
मागील वर्षी पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत विद्यमान आमदार किशोर आप्पा पाटील यांच्याविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून वैशाली सुर्यवंशी, अपक्ष उमेदवार म्हणून अमोल शिंदे, दिलीप वाघ तसेच महाराष्ट्र स्वराज्य पक्षाकडून प्रताप पाटील असे चौघांचे आव्हान होते. दरम्यान, आमदारांच्याविरोधात निवडणूक लढवणारे वैशाली सुर्यवंशी, दिलीप वाघ तसेच प्रताप पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर अवघ्या 10 महिन्यातच भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय.