नवी दिल्ली : लखपती दीदी संमेलनात सहभागी होण्यासाठी, 25 ऑगस्ट रोजी, महाराष्ट्रात जळगाव येथे जाण्यास मी उत्सुक आहे, या शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीमध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 25 ऑगस्ट रोजी जळगावच्या दौऱ्यावर येत आहेत. आज सकाळी सुमारे सव्वाअकरा वाजता ते लखपती दीदी संमेलनात सहभागी होणार आहेत. दरम्यान, जळगाव दौऱ्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीमध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी –
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘लखपती दीदी संमेलनात सहभागी होण्यासाठी, 25 ऑगस्ट रोजी, महाराष्ट्रात जळगाव येथे जाण्यास मी उत्सुक आहे’, या शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच ‘या कार्यक्रमात 11 लाख लखपती दीदींना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात येतील. ही योजना महिला सक्षमीकरणाला चालना देण्यात ही योजना महत्त्वाची भूमिका बजावत आहे. बचत गटांसोबत काम करणाऱ्या लक्षावधी महिलांना लाभ देण्यासाठी 2500 कोटी रुपयांचा निधी जारी केला जाणार आहे’, अशी माहितीही त्यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी जळगावला भेट देणार असून लखपती दीदी संमेलनात सहभागी होणार आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात नुकत्याच लखपती बनलेल्या नवीन 11 लाख लखपती दीदींना ते सन्मानित करणार असून त्यांना प्रमाणपत्र देणार आहेत. याशिवाय ते देशभरातील लखपती दीदींशी संवाद देखील साधणार आहेत. पंतप्रधान 2,500 कोटी रुपयांचा फिरता निधी जारी करतील, ज्याचा लाभ 4.3 लाख बचत गटातील सुमारे 48 लाख सदस्यांना होईल.
याशिवाय ते 5,000 कोटी रुपयांचे बँक कर्ज देखील वितरित करणार असून त्याचा लाभ 2.35 लाख बचत गटातील 25.8 लाख सदस्यांना होईल, असे सांगण्यात आले आहे. लखपती दीदी योजनेच्या आरंभापासून एक कोटी महिला याआधीच लखपती दीदी झाल्या आहेत. 3 कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे.
मुख्यमंत्र्यांसह आज अनेक मंत्र्यांची जळगावात मांदियाळी
या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच अनेक केंद्रीय मंत्री, महाराष्ट्राचे राज्यपाल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत. यामध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे (क्रीडा व युवक कल्याण), केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पेम्मासनी चंद्रशेखर (दूरसंचार व ग्रामविकास), केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव (आयुष व आरोग्य आणि कुटुंब कल्याण), केंद्रीय राज्यमंत्री कमलेश पासवान (ग्रामविकास), महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित आदी मंत्री उपस्थित राहतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जळगाव दौरा, रविवारी अजिंठा चौफुली ते नेरी मार्ग बंद, वाहतुकीत असा बदल..