ईसा तडवी, प्रतिनिधी
पिंपळगाव हरे. (पाचोरा), 24 एप्रिल : पिंपळगाव पोलीस स्टेशनला दोन वर्षांपूर्वी रुजू झालेले पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार यांना पॉस्को गुन्ह्याची यशस्वी उकल केल्याबद्दल जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. दरम्यान, पोलिस प्रशासनात काम करत असताना एसपी साहेबांच्या हस्ते झालेला गौरव उत्साही व प्रेरणादायी आहे, अशी प्रतिक्रिया पीएसआय अमोल पवार यांनी सुवर्ण खान्देश लाईव्हसोबत बोलताना व्यक्त केली.
यशस्वीपणे तपास केल्याबद्दल गौरव –
अमोल पवार हे पोलीस स्टेशनला नियुक्त झाल्यापासून त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक गुन्हे उघडकीस आणले आहे. तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांच्या कारकिर्दीत गेल्या ऑक्टोबर महिन्यात सार्वे पिंप्री येथील मूकबधिर तरुणीबाबत बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. हा गुन्हा अतिशय क्लिष्ट व गुंतागुंतीचा असल्याने आरोपीची डीएनए चाचणी करून सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याची यशस्वी उकल पीएसआय अमोल पवार यांनी पोलीस कर्मचारी मुकेश लोकरे, योगिता चौधरी, पंकज सोनवणे, अभिजीत निकम व अमोल पाटील यांच्या मदतीने केली.
दरम्यान, वरील गुन्हा कमी वेळेत सिद्ध करीत आरोपीला अटक केल्याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक महेशवर रेड्डी यांच्या हस्ते शुक्रवारी 19 एप्रिल रोजी जळगाव येथे पीएसआय अमोल पवार व सहकाऱ्यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. त्यांच्या या कार्याचे पिंपळगाव हरे. परिसरात कौतुक होत आहे.
हेही वाचा : रोहणी खडसे यांना भाजपसोबत आणण्याच्या मुद्यावरून नणंदने भावजयली सुनावले, काय आहे संपूर्ण बातमी?