चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
पाचोरा, 29 मे : सध्या सोशल मीडियावर दिवंगत माजी आमदार आर. ओ. पाटील यांनी आमदार किशोर पाटील यांच्यासंदर्भात केलेल्या एका वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. आमदार किशोर पाटील यांना प्रगल्भ करुन एक कर्तृत्त्ववान नेतृत्त्व मी उभं केलं, मला याचा अभिमान आहे, असे त्या व्हिडिओमध्ये दिवंगत माजी आमदार आर. ओ. पाटील बोलताना दिसत आहेत.
नेमकं त्या व्हिडिओमध्ये काय म्हणाले आर. ओ. पाटील? –
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या त्या व्हिडिओमध्ये दिवंगत माजी आमदार आर. ओ. पाटील म्हणाले की, “दिलीपभाऊ निवडून आल्यानंतर मी त्याच दिवशी किशोरआप्पांना सांगितलं की, आपण तयारीला लागा. मी आता आमदारकी लढणार नाही. ज्या गृहस्थाने 5 वर्षे प्रामाणिकपणे जनसेवा केली, लोकांच्या मनात एक वेगळं स्थान उभं केलं आणि लोकांनी त्यांना प्रचंड मतांनी निवडून दिलं आता मी जर त्यांच्या बरोबरीने त्या 5 वर्ष फिरलो असतो, तर वडाच्या झाडाखाली दुसरं झाड वाढत नसतं याची मला जाणीव होती.
त्याच्यामुळे मतदार पाचोरा मतदारसंघासाठी त्याला प्रगल्भ करुन आज एक कर्तृत्त्ववान नेतृत्त्व मी उभं केलं, मला याचा अभिमान आहे आणि आज तो पूर्णपणे माझ्या कसोशीला उतरला आहे. आज कधी नव्हे तरे पाचोरा मतदारसंघात 350 करोड रुपये येऊन कानाकोपऱ्यात लोकांच्या सुविधा पूर्ण करण्याचे काम करण्यासाठी कामं चालू आहेत”, असे त्या व्हिडिओमध्ये दिवंगत माजी आमदार आर. ओ. पाटील म्हणाले. दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ 2019 मधील असल्याचे सांगितले जात आहे. मार्च 2019 मध्ये आर ओ पाटील यांचे निधन झाले.
2014 मध्ये किशोर पाटील बनले आमदार –
आर. ओ. पाटील 1999 आणि 2004 साली सलग दोनदा निवडून आल्याने ते 10 वर्ष पाचोऱ्याचे आमदार होते. 2009 मध्ये त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार दिलीप वाघ यांच्याकडून पराभव स्विकारावा लागला होता. तर यानंतर किशोर पाटील हे शिवसेनेचे पदाधिकारी म्हणून राजकारणात सक्रिय झाले. 2014 मध्ये दिवंगत माजी आमदार आर. ओ. पाटील यांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आणि त्यावेळी त्यांचे पुतणे किशोर पाटील यांना आमदारकीचे तिकीट मिळाले. यानुसार 2014 आणि 2019 मध्ये सलग दोन वेळा किशोर पाटील यांनी आमदारकीची निवडणूक जिंकली.
कुटुंबातूनच मिळालं आव्हान –
2022 शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर आमदार किशोर पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. यामुळे या घटनेनंतर त्यांना त्यांच्या कुटुंबातूनच म्हणजे त्यांच्या चुलत बहीण आणि दिवंगत माजी आमदार आर. ओ. पाटील यांच्या कन्या वैशाली सूर्यवंशी यांच्याकडून आव्हान मिळाले. किशोर पाटील यांनी उद्धव ठाकरेंना सोडत एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने त्यांनी आर. ओ. पाटील यांच्या विचारांना सोडले आणि म्हणून आर. ओ. पाटील यांच्या विचारांचा वारसा पुढे चालू राहावा म्हणून मी राजकारणात आले, असे म्हणत त्यापूर्वी राजकारणात सक्रिय नसलेल्या वैशाली सूर्यवंशी यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. अशाप्रकारे शिवसेना पक्षफुटीनंतर आमदार किशोर पाटील यांना त्यांच्या चुलत बहीण आणि दिवंगत माजी आमदार आर. ओ. पाटील यांच्या कन्या वैशाली सूर्यवंशी यांच्याकडूनच थेट आव्हान मिळाले.
2024 ची विधानसभा अगदी काही महिन्यांवर –
दरम्यान, आता 2024 ची विधानसभेची निवडणूक अगदी काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे यावेळी आमदार किशोर पाटील हे 2014, 2019 नंतर पुन्हा आता 2024 विजय मिळवून पुन्हा विजयाची हॅटट्रिक करणार का की पाचोरा-भडगाव मतदारसंघातील जनता नव्या चेहऱ्याला संधी देणार, हे काही महिन्याच स्पष्ट होणार आहे.
हेही वाचा : “देशाला फूलटाईम कृषी मंत्री नाही, अन् कृषीप्रधान देश म्हटला जातो”, उन्मेश पाटील यांची सरकारवर टीका