ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 22 सप्टेंबर : जळगाव जिल्ह्यात काल रात्रीपासून सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू असून पाचोऱ्यातील हिवरा नदीला पूर आलाय. हिवरा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने नागरिकांनी देखील काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. दरम्यान, पाचोरा शहरातील कृष्णापुरी भागातील असलेल्या पुलाची उंची वाढविण्यात आल्यानंतर, त्या पुलापर्यंत पाणी आल्याने हिवरा नदीला पहिल्यांदाच एवढा पूर आल्याचे सांगितले जात आहे.
पाचोऱ्यात हिवरा नदीला पूर –
पाचोरा तालुक्यात रात्रीपासून जोरात पाऊस सुरू आहे. यामुळे तालुक्यातील बहुळा हिवरा व आगनावती मध्यम प्रकल्प तसेच म्हसाळा(कोकडी) सार्वेपिंप्री, सातगाव डोंगरी, गहुला, पिंपळगाव कोल्हे, सार्वा-खाजोळा, बदरखा, गाळण, तारखेडा,कळमसरा हे लघु प्रकल्प सुद्धा पूर्ण भरले आहेत.तसेच त्यातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. तसेच अंतुर्ली (बुवाची) याठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याचे सांगितले जात आहे.
नागिराकांनी काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन –
पाचोरा तालुक्यातील काल रात्रीपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे आज सकाळपासून हिवरा 8000, अग्नावती 4000 आणि बहुळा 1500 क्यूसेक्स पाणी या नदीपात्रात वाहत आहे. दरम्यान, ते आणखी वाढण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, नदीकाठच्या लोकांनी सतर्कता बाळगावी तसेच नदीपात्रात जाऊ नये अन् गुरेढोरे बांधू नये, असे आवाहन पाचोरा पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी प्रवीण टी. पाटील यांनी केले आहे.
View this post on Instagram
मुसळधार पावसामुळे शेतकरी चिंतेत –
मागील आठवड्यात जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर, जामनेर तसेच पाचोरा तालुक्यात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच पाचोऱ्यातील सातगाव डोंगरीत अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने संसारपयोगी साहित्य वाहून गेले. यासोबतच काही जनावरे देखील पाण्यात वाहून गेले तर काही जागीच मृत्यू मुखी पडले. यानंतर प्रशासनाकडून पंचानामे करण्याची कार्यवाही तातडीने केली जात आहे.
दरम्यान, जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून ओला दुष्काळ जाहीर करण्याची देखील मागणी आता शेतकऱ्यांकडून केली जात आहे. तर दुसरीकडे जळगाव जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाची सुरूवात झाली असून पुढील दोन दिवस जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.