नवी दिल्ली, 20 डिसेंबर : रावेर लोकसभा क्षेत्रातील आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केंद्रीय आयुष मंत्रालयाचे (स्वतंत्र प्रभार) तसेच आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची नवी दिल्ली येथे सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सन 2026-27 या आर्थिक वर्षात रावेर लोकसभा मतदारसंघातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, ग्रामीण रुग्णालये तसेच कर्मचारी निवासस्थानांच्या बांधकामासाठी निधी मंजूर करण्याबाबत सविस्तर मागणीपत्र सादर केले.
रावेर मतदारसंघातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे व कर्मचारी निवासस्थानांच्या इमारती अत्यंत जीर्ण अवस्थेत असून, रुग्ण व आरोग्य कर्मचाऱ्यांना मूलभूत सुविधांचा अभाव भासत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. त्यामुळे जुन्या इमारती पाडून नव्या, सुसज्ज इमारतींचे बांधकाम करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
निवेदनात मुक्ताईनगर, रावेर, भुसावळ, यावल, चोपडा व बोदवड तालुक्यांतील प्राथमिक आरोग्य केंद्रे व कर्मचारी निवासस्थानांचे नव्याने बांधकाम, काही ठिकाणी केवळ कर्मचारी निवासस्थाने उभारणे, तसेच पाल, रावेर व बोदवड येथील ग्रामीण रुग्णालयांचे पुनर्बांधकाम आणि सावदा येथे शवविच्छेदन कक्ष उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी विविध गावांमध्ये नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांच्या बांधकामाचीही मागणी यावेळी करण्यात आली.
प्रतापराव जाधव यांनी सदर मागणी गांभीर्याने विचारात घेऊन तत्काळ आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. रावेर लोकसभा क्षेत्रातील नागरिकांना दर्जेदार व सुलभ आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी यावेळी सांगितले.






