मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून ज्याची चर्चा होती, तो क्षण अखेर आज आला. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री रविंद्र चव्हा यांची आज भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. केंद्रीय संसदीय कार्य व अल्पसंख्याक विकासमंत्री तसेच भाजपाचे नेते किरेन रिजिजू यांनी याबाबतची अधिकृत घोषणा केली.
रवींद्र चव्हाण यांना याआधी काही दिवसांपूर्वी भाजपा प्रदेश कार्यकारी अध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. यानंतर आज त्यांची महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. भाजपच्या वतीने आयोजित मुंबईतील कार्यक्रमात त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यामुळे रविंद्र चव्हाण हे महाराष्ट्र भाजपचे बॉस असणार आहेत.
माझे सहकारी आ. रविंद्र चव्हाण यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन!
पुढील वाटचालीसाठी त्यांना खूप-खूप शुभेच्छा! @RaviDadaChavan @BJP4Maharashtra #Maharashtra #Mumbai #BJP #RavindraChavan4BJP pic.twitter.com/oghgsDOiL9— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 1, 2025
कोण आहेत रविंद्र चव्हाण –
रवींद्र चव्हाण यांचा जन्म 20 सप्टेंबर 1970 रोजी झाला. त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले असून सर्वात आधी 2002 मध्ये भाजप युवा मोर्चाचे कल्याण जिल्हा उपाध्यक्ष म्हणून त्यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात झाली. यानंतर 2005 मध्ये ते कल्याण डोंबिवली महापालिकेचे नगरसेवक म्हणून निवडून आले. तर 2007 मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असतानाही भाजप नगरसेवक असूनही स्थायी समितीचे सभापती झाले.
रविंद्र चव्हाण 2009, 2014, 2019 आणि 2024 मध्ये आमदार म्हणून निवडून आले आहेत. 2022 मध्ये रवींद्र चव्हाणांना मंत्री पदाचीही जबाबदारी देण्यात आली होती. त्यांच्याकडे पीडब्ल्यूडी खाते होते. त्यांनी सिंधूदुर्गचे पालकमंत्री म्हणूनही कारभार सांभाळला आहे.
रविंद्र चव्हाण हे प्रभावी नेते मानले जातात. तसेच त्यांचा तळागाळातील भाजपा कार्यकर्त्यांबरोबर दांडगा जनसंपर्क असल्याचेही बोलले जाते. त्यामुळे आता आगामी महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर रविंद्र चव्हाण यांची निवड महत्त्वाची मानली जात आहे.