शिर्डी, 7 जानेवारी : नाताळ, सरते वर्ष आणि नववर्ष स्वागताच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या ‘शिर्डी महोत्सवा’ ला यंदा साईभक्तांचा प्रचंड प्रतिसाद लाभल्याचे दिसून आले आहे. शिर्डीत 25 डिसेंबर 2025 ते 2 जानेवारी 2026 या कालावधीत देश-विदेशातून तब्बल 8 लाखांहून अधिक भाविकांनी हजेरी लावत साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दरम्यान, या नऊ दिवसांत भाविकांनी श्रद्धेने 23 कोटी 29 लाख 23 हजार 373 रुपये इतकी विक्रमी देणगी साई संस्थानला अर्पण केल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.
दरम्यान, साई संस्थानकडे जमा होणाऱ्या देणग्यांचा वापर लोककल्याणासाठी केला जात असल्याचे गोरक्ष गाडीलकर यांनी स्पष्ट केले. साईबाबा रुग्णालय, साईनाथ रुग्णालयातील वैद्यकीय सेवा, मोफत भोजन व्यवस्था, शैक्षणिक संस्था तसेच विविध सामाजिक उपक्रमांसाठी या निधीचा विनियोग केला जातो. महोत्सवाच्या काळात कर्मचारी, स्वयंसेवक आणि सुरक्षा यंत्रणांनी भाविकांना सुरक्षित व सुलभ दर्शन मिळावे यासाठी विशेष परिश्रम घेतल्याचेही त्यांनी नमूद केले.
साई महोत्सवात जमा झालेली देणगी खालीलप्रमाणे –
- दानपेटीतून 6 कोटी 2 लाख 61 हजार 6 रुपये
- देणगी काउंटरद्वारे 3 कोटी 22 लाख 43 हजार 388 रुपये
- पीआरओ सशुल्क पासद्वारे 2 कोटी 42 लाख 60 हजार रुपये
- डेबिट-क्रेडिट कार्ड, ऑनलाईन देणगी, चेक आणि मनीऑर्डरद्वारे 10 कोटी 18 लाख 86 हजार 955 रुपये जमा
- 26 देशांच्या परकीय चलनातून संस्थानला मिळाले 16 लाख 83 हजार 673 रुपये
- 293 ग्रॅम सोने (किंमत सुमारे 36.38 लाख रुपये)
- सुमारे 6 किलो चांदी (किंमत 9.49 लाख रुपये)
- एका साईभक्ताने 80 लाख रुपये किमतीचा सुवर्ण-हिरे जडीत मुकुट साईबाबांच्या चरणी केला अर्पण
- 7 लाख 67 हजार लाडू पाकिटांच्या विक्रीतून 2.30 कोटी रुपये संस्थानला प्राप्त
भाविकांकडून साई प्रसादालयातील मोफत भोजनाचा लाभ –
भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता साई संस्थानकडून दर्शन व्यवस्थेसह अन्नदानाचे सुयोग्य नियोजन करण्यात आले होते. या नऊ दिवसांत 6 लाखांहून अधिक भाविकांनी साई प्रसादालयातील मोफत भोजनाचा लाभ घेतला, तर 1 लाख 9 हजार भाविकांना अन्न पाकिटांचे वितरण करण्यात आले. याच कालावधीत 7 लाख 67 हजार लाडू पाकिटांच्या विक्रीतून 2.30 कोटी रुपये संस्थानला प्राप्त झाले, तर 5 लाख 76 हजार भाविकांना मोफत बुंदी प्रसाद देण्यात आल्याच्या माहिती संस्थांनच्यावतीने देण्यात आली आहे.






