गडचिरोली, 31 जानेवारी : समाजात शिक्षण, संशोधन आणि जागरुकता निर्माण करणे गरजेचे आहे त्यासाठी विद्यापीठाचा ’ब्लॉसम’ हा महत्वपूर्ण उपक्रम असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू आणि निवृत्त लेफ्टनन्ट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांनी केले.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि आदिवासी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाचा ’ब्लॉसम’ उपक्रमांतर्गत चंद्रपूर व गडचिरोली विभागातील संशोधन कार्याचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. याप्रसंगी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर (निवृत्त) समवेत लोकबिरादरी प्रकल्पाचे संस्थापक पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे, डॉ. मंदाकिनी आमटे, समन्वयक डॉ. संजीव चौधरी, ट्रायबल हेल्थ रिसर्चर डॉ. दिलीप गोडे आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी कुलगुरू डॉ. कानिटकर यांनी सांगितले की, दूर्गम भागातील लोकांना आरोग्य व शिक्षण आदी सुविधा पुरविणे गरजेचे आहे. यासाठी दूर्गम क्षेत्रात काम करणारे आरोग्यसेवक व विद्यार्थी यांच्या मदतीने माहिती संकलित करणे आवश्यक आहे. आरोग्य विषयक संशोधन करण्यासाठी आदिवासी समाजातील लोकांचे प्रश्न, आरोग्य विषयक समस्या जाणून घेणे गरजेचे आहे. यासाठी ‘ब्लॉसम’च्या माध्यमातून राज्यातील दूर्गम भागातील लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचे काम करण्यात येत आहे.
‘ब्लॉसम’ नावांत ब्रेस्ट कॅन्सर, लिव्हर डिसऑर्डर, ऑस्टीओपोरसिस, सेक्युअल ट्रान्समिटेड डिसिज, सिकल सेल डिसिज, ओरल मॅलीग्नेसिस आणि मालन्युट्रीशन आदी (BLOSSOM – Breast Cancer, Liver disorders, Osteoporosis, Sexually Transmitted Diseases, Sickle cell disease, Oral malignancies and Malnutrition) आजारांच्या नावांचा समावेश आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून सदर आजारांवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. लोकबिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून विदर्भातील विविध भागात आरोग्य क्षेत्रात काम करणारे डॉ. प्रकाश आमटे यांचे मार्गदर्शन या प्रकल्पासाठी महत्वपूर्ण ठरणार असल्याचेही त्या म्हणाल्या.
या प्रकल्पाच्या उद्घाटन कार्यक्रमात पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांनी सांगितले की, दूर्गम भागातील लोकांसाठी आरोग्य विद्यापीठाचा ‘ब्लॉसम’ हा महत्वपूर्ण आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून मिळणारी माहिती संशोधन आणि विविध प्रकल्पांसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. आदिवासी भागातील तळागाळातील लोकांपर्यत पोहचून काम करणे कौतुकास्पद आहे. दूर्गम भागात सिकलसेल, कुपोषण, कर्करोग, यकृताचे विकार, ऑस्टिओपोरोसिस, लैंगिक संक्रमित रोग आदी आजार मोठया प्रमाणात आढळतात. याकरीता रुग्णांची तपासणी, उपचार व मार्गदर्शन गरजेचे आहे. डॉक्टर आणि पॅरामेडिकल कर्मचारी तात्काळ दूर्गम भागात तात्काळ पोहचणे गरजेचे आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून समाजात शिक्षण, संशोधन आणि जागरूकता निर्माण करणे महत्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगतले.
हेही वाचा – पदाला न्याय दिल्यानंतरच समाजाचा विकास साधता येतो, शशिकांत दुसाने यांचे प्रतिपादन
विद्यापीठाच्या ‘ब्लॉसम’ प्रकल्पाचे समन्वयक डॉ. संजीव चौधरी यांनी सांगितले की, मा. कुलगुरू महोदया यांच्या संकल्पनेतून ‘ब्लॉसम’ उपक्रम साकारण्यात आला आहे. हा प्रकल्प तीन टप्प्यांमध्ये कार्यान्वित केला करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात स्क्रीनिंग, सोल्यूशन आणि नियोजन दुसऱ्या टप्प्यात आदिवासी लोकसंख्येमध्ये विविध रोगांचे प्रमाण निश्चित करण्यासाठी समुदाय आधारित क्रॉस सेक्शनल सर्वेक्षणाचा तर तिसऱ्या टप्प्यात निष्कर्षांवर आधारित उपाय योजना करण्यासाठी लक्ष केंद्रित करणार आहे. या प्रकल्पासाठी विकसित करण्यात आलेल्या पध्दतीनुसार समाजातील लोकांचे आरोग्य व सेवा पोहोचविण्यावर भर दिला दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा येथे आयोजित ‘ब्लॉसम’ प्रकल्पाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी ‘ब्लॉसम’ प्रकल्पाचे मुख्य अन्वेषक डॉ. अजित सावजी, डॉ. शिल्पा हजारे, सहअन्वेषक डॉ. यामिनी पुसदेकर, डॉ. किरण तवलारे, डॉ. कल्पना तवलारे, डॉ. सचिन खत्री, विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. उदयसिंह रावराणे, डॉ. मानसी कुंटे आदी अधिकारी व प्रकल्पातील सहभागी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.